लागला टकळा पंढरीचा.. पंढरीच्या वाटे वारकरी हुरूहुरू पाहे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 06:06 PM2020-06-21T18:06:01+5:302020-06-21T18:06:45+5:30
लखमापूर : कोरोनामुळे पंढरपूरची वारी रद्द झाल्याने दिंडोरी तालुक्यातील पायी वारी करणारे वारकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आहेत. यंदा पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने वारकऱ्यांचा जीव कसावीस होत आहे. वारकरीवर्गाचे मन पंढरपुरात लागून राहिले आहे. वारकरी शरीराने आपापल्या गावी असले तरी त्यांच्या मनात दिंडीची हुरहुर सुरू झाली आहे.
लखमापूर : कोरोनामुळे पंढरपूरची वारी रद्द झाल्याने दिंडोरी तालुक्यातील पायी वारी करणारे वारकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आहेत. यंदा पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने वारकऱ्यांचा जीव कसावीस होत आहे. वारकरीवर्गाचे मन पंढरपुरात लागून राहिले आहे. वारकरी शरीराने आपापल्या गावी असले तरी त्यांच्या मनात दिंडीची हुरहुर सुरू झाली आहे. वारकरी वर्गाची पावले मनाने पंढरीच्या वाटेवर चालू लागली आहे. ‘लागला टकळा पंढरीचा’ अशी अवस्था वारकरी वर्गाची झाली आहे. वारीच्या वाटेवर आलेला अनुभव काही वारकरी आता आपल्या गावातील पारावर बसून, डोळ्यातील अश्रु पुसत एकमेकांना सांगत आहेत.
आजच्या तिथीनुसार दिंडी कुठे मुक्कामी राहाते. तेथे कोणाचे कीर्तन राहाते, हे कथन करताना वारकरी वर्गाचे मन भरून येते.
टाळी वाजवावी, गुडी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची,अशा गोड अभंगाचा स्वर आता कानावर पडत नसल्यामुळे वारकरी यंदा घरीच थांबल्याने खिन्न मनाने संताचे अभंग म्हणत आहे. त्यामुळे ‘पंढरीची वारी आहे माझे घरी’असे अभिमानाने सांगणाºया वारकरी मंडळींना यंदा मात्र कोरोनाच्या साथीमुळे घरीच थांबावे लागले आहे.
वारकरी सांप्रदायाचे विश्वगुरु श्री संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पौर्णिमेच्या दुसºया दिवशी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान होते. आषाढी वारी म्हणजे वारकरी सांप्रदायातील एक महान पर्वणीच मानली जाते. परंतु कोरोनामुळे या पर्वणीला ब्रेक लागला आहे. अजून किती दिवस आमच्या लाडक्या विठुरायाचे मुखदर्शन होणार नाही, असा सवाल वारकरी मंडळींनी विचारला आहे.
अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी करणारे काही कीर्तनकारांनी पंढरीची वारी यंदा न घडल्याने खंत व्यक्त केली आहे.
प्रतिक्रि या...
मी वयाच्या ११व्या वर्षापासून पंढरपूरची वारी करतो. परंतु यंदा कोरोनामुळे वारीची परंपरा खंडित झाली. खूप दु:ख होत आहे.
- वाल्मिक महाराज, ब्राह्मणगावकर
पंढरीची वारी माझ्या घरी असून आम्ही नित्यनेमाने पंढरपूरची वारी करीत आलो आहे. परंतु यंदा आम्हाला आमच्या सावळ्या पांडुरंगाचे मुख दिसणार नसल्यामुळे मनस्वी खूप दु:ख होत आहे.
- रामकृष्ण महाराज पिंपरखेडकर
मला समजत नव्हते. तेव्हापासून मी पंढरपूरची वारी करतो. अजूनपर्यंत वारी कधी खंडित झाली नाही. परंतु यंदा शासनाने पंढरीची वारी रद्द केल्याने आमचे कुलदैवत पांडुरंग परमात्म्याचे रूप आम्हाला दिसणार नसल्यामुळे आमची मन:स्थिती खिन्न झाली आहे.
- निवृत्तिनाथ महाराज काळे, दिंडीचालक, विजयनगर (फोटो२१वारकरी)(संग्रहीत)