टाकळीचा गोमय मारुती चार शतकांनंतर मूळ रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:53+5:302021-01-02T04:12:53+5:30
नाशिक : आगर टाकळी येथे समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या हाताने स्थापित केलेल्या गोमय हनुमान मूर्तीच्या मागील बाजूस ...
नाशिक : आगर टाकळी येथे समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या हाताने स्थापित केलेल्या गोमय हनुमान मूर्तीच्या मागील बाजूस असलेली माती, चुना, दगडाची भिंत सुरक्षितरीत्या उतरवल्याने तब्बल ४०० वर्षांनंतर गोमय मारुतीचे मूळ स्वरूपात दर्शन होत आहे.
समर्थ रामदास स्वामींनी नाशिकला आल्यानंतर ज्या गुहेत वस्ती करून प्रभू श्रीरामाची आराधना केली, त्या ठिकाणीच त्यांनी एका भव्य गोमय मारुतीची स्थापना केली होती. समर्थस्थापित गोमय हनुमानाची ही पहिली मूर्ती मानली जाते. नाशिकहून देशभ्रमणाला निघण्यापूर्वी त्यांनी उद्धवस्वामी यांना पूजा-अर्चा करण्यासाठी या हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्या मूळ मूर्तीच्या मागील बाजूस त्या काळानंतरच्या गत चार शतकांमध्ये चुना, दगड आणि मातीची तीन स्तरांची भिंत उभारली गेली. नुकतीच ही भिंत वास्तुविशारद राजवाडे आणि तांबट यांच्या मार्गदर्शनाखाली उतरवण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर, ॲड. भानुदास शौचे, हेमा शिरवाडकर, पुजारी रमेश कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या मूळ मूर्तीला कुठेही धक्का लागू न देता त्यामागे काळ्या पाषाणाची भिंत लवकरच उभारण्यात येणार आहे. गोमय हनुमानाच्या मूळ मूर्तीची पुढील बाजू ही शेण, गोमूत्र आणि राखेपासून तयार करून त्यावर शेंदुराचा लेप लावण्यात आलेला आहे. मंदिरावर मोठा कळस उभारण्यात येऊन प्लास्टरचे कामदेखील पूर्ण झाले असून, लवकरच कलशस्थापना केली जाणार आहे.
---फोटो----
०१गोमय मारुती