तलाठ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 01:35 AM2021-10-13T01:35:04+5:302021-10-13T01:35:27+5:30
तलाठी संवर्गाबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या तलाठी संघटनेने बुधवार (दि.१३) पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांचे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट अधिकार तहसीलदारांकडे सुपूर्द केले असून आंदोलनाची हाक दिली आहे.
नाशिक: तलाठी संवर्गाबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या तलाठी संघटनेने बुधवार (दि.१३) पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांचे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट अधिकार तहसीलदारांकडे सुपूर्द केले असून आंदोलनाची हाक दिली आहे.
भूमीअभिलेख समन्वक रामदास जगताप यांनी तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांच्याविषयी अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी राज्यातील तलाठ्यांनी आंदोलन पुकारले आहे. जगताप यांची बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला असून, बुधवारपासून कामबंद आंदेालन केले जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज वगळता अन्य सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा राज्य संघटनेने केली आहे. नाशिक जिल्हा तलाठी संघदेखील या आंदोलनात सहभागी असून त्यांनी मंगळवारी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट तहसीलदारांकडे परत केले आहे.
नाशिक जिल्हा तलाठी संघाने जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलनात सहभागी असल्याचे जाहीर केले असून जिल्ह्यातील सर्व तलाठी नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज वगळता कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचे नाशिक जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष निळकंठ उगले, कार्याध्यक्ष एम.एल. पवार, सरचिटणीस बाबासाहेब खेडकर यांनी सांगितले.