तलाठी परीक्षेचे सर्व्हर डाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:10 AM2019-07-24T00:10:02+5:302019-07-24T00:11:04+5:30
महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.
नाशिक : महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.
महापरीक्षेंतर्गत शहरात गेल्या २ तारखेपासून तलाठी पदासाठीची परीक्षा सुरू आहे. मात्र या परीक्षेसंदर्भातील अनेक अडचणी अजूनही समोर येत असून, मंगळवारी शहरातील व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निकल इन्सिट्यूट या परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. शहरातील विविध सहा केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जात असून, सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत परीक्षा घेतली जात आहे. सकाळी १० वाजता सकाळचे सत्र तर दुपारी २ वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले होते. नियमानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कागदपत्रे तपासली जात असतानाच सर्व्हर डाउन असल्याचे परीक्षा केंद्रप्रमुखाच्या लक्षात आले. त्यांनी वारंवार प्रयत्न केला तसेच शासनाच्या परीक्षा नियंत्रकांनादेखील याबाबतची माहिती दिली. परंतु परीक्षेच्या निर्धारित वेळेत म्हणजे दहा वाजेपर्यंत सर्व्हर सुरू होऊ न शकल्याने अखेर परीक्षा रद्द करावी लागली.
या परीक्षेसाठी उमेदवाराने ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्राच्या आवारात असावे, असा परीक्षेचा निमय आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक निर्धारित वेळेत केंद्रावर हजर होते. परंतु व्ही. एन. नाईक याा केंद्रातील सर्व्हर डाउन झाल्यानंतर कोणताही कमांड घेत नसल्याने महापरीक्षेला सदर बाब कळविण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या बॅचची परीक्षा रद्द झाली, मात्र दुपार सत्रातील परीक्षा मात्र सुरळीत पार पडली.
अडचणी कायम उमेदवारांच्या तक्रारी
तलाठी परीक्षा गेल्या २ तारखेपासून सुरू असून परीक्षेतील अडचणींच्या अनेक कथा ऐकायला मिळत आहे. अनेक केंद्रांवर मुलांना अडचणी येत असताना विद्यार्थ्यांचे मात्र समाधान होऊ शकलेले नसताना पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. यापूर्वी अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या अडचणी आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा देत आहेत.