तलहा परतला; मात्र कोरोना दहशतीने एकांतातच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:09 AM2020-02-22T01:09:40+5:302020-02-22T01:25:54+5:30
सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूची दहशत असून, चीनच्या वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला येथील तलहा खलील अहमद शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तलहाच्या कुटुंबीयांना त्याच्याशी कोणताही संपर्क न ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्याने तलहा सध्यातरी एकांतातच आहे.
शफीक शेख
मालेगाव : सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूची दहशत असून, चीनच्या वुहानमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला येथील तलहा खलील अहमद शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी परतला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तलहाच्या कुटुंबीयांना त्याच्याशी कोणताही संपर्क न ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्याने तलहा सध्यातरी एकांतातच आहे. दरम्यान रात्री शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन त्याच्यासह कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करून काही सूचना केल्या. शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन तलहाच्या प्रकृती आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी वैद्यकीय अधिकारी माहिती देणार आहेत.
सर्व जग कोरोना विषाणूच्या भीतीने ग्रासलेले असताना चीनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेला तलहा अहमद मालेगावी परतत असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने शहरातही कुतुहल आणि भीतीचे वातावरण होते. डॉक्टरांनीही तलहाच्या वडिलांना सक्त सूचना दिल्याने शुक्रवारी तलहाला कुणालाही भेटू दिले नाही. पत्रकारांकडून वारंवार संपर्क साधला जात असताना त्याचे कुटुंबीय मात्र काहीही बोलत नव्हते. वैद्यकीय अधिकारीदेखील काही बोलत नव्हते.
दरम्यान, तलहा अहमदशी त्याचे वडील खलील अहमद यांनी मोबाइलवरून संपर्क साधून दिला. तलहा म्हणाला, मी चीनमध्ये होतो तेव्हाही वडील आणि कुटुंबीयांच्या संपर्कात होतो. आम्हाला विद्यापीठात बंद करून टाकण्यात आले होते. सर्व व्यवहार बंद झाले होते. विद्यापीठात आम्हाला मास्क पुरविण्यात येत होते. बाहेर कुणाशी संपर्क साधू दिला जात नव्हता. विद्यापीठाबाहेरून कुणीही मदत करीत नव्हता. केवळ विद्यापीठाकडूनच आम्हाला मदत मिळत होती. आम्हाला दैनंदिन लागणारे साहित्य विद्यापीठ बाहेरून पुरवित होते, मात्र घरी प्रचंड दहशत होती. आम्ही सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे आम्ही रोज पालकांना सांगत होतो. भारतीय दुतावासाने आम्हा विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे सातशे विद्यार्थ्यांना दिल्लीत आणले गेले. तेथे रक्ताचे नमुने घेतले गेले, त्यानंतर हरियानाच्या मणिसार मिलिटरी ट्रेनिंग कॅम्पमध्ये हलविण्यात आले. तेथे डॉक्टर्स रोज येऊन चेकअप करीत. रोज नियमित जेवण नेहमीप्रमाणे असे. कोणतेही बंधन नव्हते. सर्वांना वेगेवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले होते; तर मुलींना मात्र दिल्लीतच वेगवेगळे ठेवण्यात आले होते. आम्हाला वारंवार फोनवरून सूचना दिल्या जायच्या, मात्र आता पुढे काय होईल, कुठे पाठविले जाईल, याबाबत काही सांगितले जायचे नाही. महाराष्ट्रातील माझ्या परिचयाचे चार जण होते. त्यात एक जण नाशिकचा, तर इतर मुंबई, ठाणे आणि कल्याणचे विद्यार्थी होते.
अखेर कालपर्यंत हरियानात शासकीय वैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर आम्हाला कोणताही आजार नसल्याचे सर्टिफिकेट देऊन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आता तलहा जरी मालेगावात आला असला तरी त्याला पंधरा दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली राहावे लागणार आहे. रोज शासकीय वैद्यकीय पथक त्याच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करणार आहे. त्याच्या कुुटुंबीयांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, परिसरावर वैद्यकीय अधिकाºयांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
आम्ही सर्व कुटुंबीय दहशतीत आहोत. आपल्या मुलाला समाजाकडून काही त्रास होऊ नये म्हणून त्याचा फोटो देण्यास वा फोटो काढू देण्यास सक्त मनाई केली, मात्र तरी त्याचे नातेवाईक आणि मित्र परिवार फोनवर संपर्क साधून प्रकृतीची चौकशी करीत आहेत.
- खलील अहमद, तलहाचे वडील