व्यावसायिकांच्या अपहरणप्रकरणी टाेळी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:16+5:302021-01-21T04:15:16+5:30
याबाबत अधिक माहिती अशी बांधकाम व्यावसायिक फिर्यादी बबन शिंदे व प्रवीण विभांडिक यांनी काही दिवसापूर्वी संशयित आबा चौधरी याच्याकडून ...
याबाबत अधिक माहिती अशी बांधकाम व्यावसायिक फिर्यादी बबन शिंदे व प्रवीण विभांडिक यांनी काही दिवसापूर्वी संशयित आबा चौधरी याच्याकडून बांधकाम व्यवसायासाठी ४० लाख रुपये उसनवार घेतले होते. त्याबदल्यात काही रक्कम व जागा नावावर करून दिली होती. काल दुपारी चौधरी याने शिंदे यांना फोन करून ‘उर्वरित पैसे दे नाही तर बघून घेईल’ असा दम भरला आणि जेलरोडला भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी दोघे भेटायला गेले, मात्र त्यानंतर त्यांना आडगाव हद्दीतील हॉटेलात बोलविले तेथे गेल्यावर वाद घालत लोखंडी गज, काठ्यांनी बेदम मारहाण केली व त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीत डांबून अपहरण करीत गंगावाडीत नेले. त्याठिकाणी विभांडिक व शिंदे यांना गाडीतून खाली उतरवून पुन्हा अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर एकाने विभांडिक याच्या डोक्याला बंदूक लावून पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रात्री उशिरा बबन शिंदे यांच्या तक्रारीवरून संशयित चौधरी आणि अन्य इतर सहा ते सात संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी सायंकाळी चौधरी याच्यासह चार ते पाच जणांना ताब्यात घेतले तर, उर्वरित संशयित पसार झाले आहेत.
---इन्फो ---
सावकारी व्यवसाय पुन्हा चर्चेत
आडगाव शिवारात घडलेल्या अपहरण प्रकरणावरून नाशिक शहरात सावकारी व्यवसाय पुन्हा तेजीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम व्यावसायिक शिंदे व विभांडिक यांनी चौधरी याच्याकडून व्यवसाय करण्यासाठी लाखो रुपये व्याजाने घेतले होते. रक्कम वेळेत परत केली नाही म्हणून सावकाराने दोघांना मारहाण करून अपहरण करीत अमानुष अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन खासगी सावकारांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.