जिल्ह्यातील तळीरामांची दीडशे ठिकाणी सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 12:59 AM2021-05-01T00:59:57+5:302021-05-01T01:01:32+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुकानांना बंदी घातली असली तरी, राज्याच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावणाऱ्या मद्य विक्रीला ऑनलाइन परवानगी देण्यात आली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने व परमिट रूम अशा सुमारे दीडशे ठिकाणी ही विक्री सुरू करण्यात आली असून, आठ दिवसात नऊ हजार जणांनी ऑनलाइन मद्याचा आस्वाद घेतला आहे.
नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुकानांना बंदी घातली असली तरी, राज्याच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावणाऱ्या मद्य विक्रीला ऑनलाइन परवानगी देण्यात आली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने व परमिट रूम अशा सुमारे दीडशे ठिकाणी ही विक्री सुरू करण्यात आली असून, आठ दिवसात नऊ हजार जणांनी ऑनलाइन मद्याचा आस्वाद घेतला आहे. राज्य सरकारने संचारबंदी व जमावबंदी आदेश जारी केले असल्याने मद्यविक्रीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहर व जिल्ह्यात ऑनलाइन विक्री करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला. ज्या मद्यविक्रेते व बिअर बार चालकांना ऑनलाइन मद्यविक्री करायची आहे, अशांकडून प्रस्तावही मागविले होते. त्यानुसार नाशिकमधून १५ मद्यविक्रेते (वाईनशॉप) देशी दारू विक्रीचे ५२ दुकानदार व ९२ परमिट रूम बिअरबार विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून परवानगी घेतली आहे. त्यासाठी दुकानदारांनी थेट मद्यपींच्या घरपोच मद्य पोहोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर मागणी नोंदविल्यास मद्य पुरविले जात आहे. गेल्या आठ दिवसात या सेवेचा सुमारे नऊ हजार मद्यपींनी लाभ घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुले यांनी दिली.