पक्ष सोडण्याची चर्चा कल्पनेपलीकडची; खासदार राजाभाऊ वाजेंचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:33 IST2025-02-08T10:32:48+5:302025-02-08T10:33:16+5:30
मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ होतो आणि यापुढेही राहणार असल्याचा दावा देखील वाजे यांनी केला आहे.

पक्ष सोडण्याची चर्चा कल्पनेपलीकडची; खासदार राजाभाऊ वाजेंचं स्पष्टीकरण
Rajabhau waje: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असल्याने त्यात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याही नावाबाबत समाज माध्यमांतून जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, वाजे यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. जाणीवपूर्वक या बातम्या पसरवल्या जात असून, आपण ऑपरेशन टायगरबाबत अनभिज्ञ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्ष सोडण्याची चर्चा कल्पनेपलीकडची असून, आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ होतो आणि यापुढेही राहणार असल्याचा दावा देखील वाजे यांनी केला आहे.
दिल्ली येथे खासदार अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची पत्रकार परिषद झाली. या बैठकीला खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह ठाकरे गटाचे सर्व खासदार उपस्थित होते. आपल्याशी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी संपर्क केला नसल्याचे वाजे यांनी सांगितले. मी कुठेच जाणार नाही. केवळ लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. आपण दिल्ली येथे अधिवेशनासाठी आलो असून, ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे वाजे म्हणाले.
कोणकोणत्या खासदारांची उपस्थिती?
खासदार सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, नागेश अष्टीकर आणि संजय देशमुख हे खासदार उपस्थित होते.