चौरंगी लढतीकडे तालुक्याचे लक्ष
By admin | Published: February 10, 2017 11:11 PM2017-02-10T23:11:25+5:302017-02-10T23:11:36+5:30
चुरस : प्रस्थापित राष्ट्रवादी कॉँग्रेसला शिवसेनेचे कडवे आव्हान
दत्ता महाले येवला
भाजपा-सेना काडीमोड आणि राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांच्यात झालेल्या बिघाडीमुळे येवला तालुक्याच्या राजापूर गटात चौरंगी लढत होत आहे. तालुक्यातील राजकारणात नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रस्थापित राष्ट्रवादीच्या सत्तेला पुन्हा शिवसेनेने आव्हान देण्याचा शंखनाद केला असून, आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. शिवसेनेचे सध्याचे दोन मात्तबर नेते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि संभाजीराजे पवार यांना आगामी विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यामुळे स्वत:सह आपले समर्थक निवडून आणण्यासाठी त्यांची मेहनत चालू आहे. राजापूर गट, नगरसूल गट गणासह अन्यत्र आपले समर्थक कसे निवडून येतील, याचा प्रयत्न करीत आहेत.
नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वकियांकडून ग्रहण लागल्याची सल अॅड. माणिकराव शिंदे, यांच्या मनाला चाटून गेली. अंदरसूल गटातून शाहुराजे शिंदे यांची राष्ट्रवादीची उमेदवारी कापली गेली. त्यामुळे शिंदे हे राष्ट्रवादीची कितपत पाठराखण करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या सुरेखा दराडे यांना त्यांच्या राजगडात राष्ट्रवादीने जलतज्ज्ञ भागवत सोनवणे यांच्या पत्नी शकुंतला सोनवणे यांना उमेदवारी देऊन आव्हान दिले आहे, तर सेना-भाजपाची काडीमोड झाल्याने माजी आमदार, भाजपाचे कल्याणराव पाटील, आनंद शिंदे, शहराध्यक्ष राजुसिंग परदेशी यांनी अच्छे दिन ‘कॅश’ करण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते आरती गणेश ढाकणे यांना संधी देऊन दराडे यांना रोखण्याच्या खेळीचे एक पाऊल उचलले. सध्या या राजापूर गटात सोशल मीडियावर प्रचाराचे युद्ध चालू आहे. प्रत्यक्ष गाठीभेठी घेण्याचे सत्र सुरु आहे. आगामी काळात या गटात चांगलीच चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राजकीयदृष्ट्या हा गट लक्षवेधी बनला आहे. गेल्या निवडणुकीत आमदार छगन भुजबळ, शिंदे दराडे, बनकर व पवार एकत्रित होते. त्यामुळे सगळीकडे राष्ट्रवादीचा बोलबाला होता. परंतु आता दराडे-पवार सेनेत आहेत. राष्ट्रवादीला कडवे आव्हान दिले आहे. राजापूर गट ओबीसी महिला राखीव झाला. माजी आमदार स्व.जनार्दन पाटील यांचे नगरसुलसह राजापूर गटात त्यांनी राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले होते.त्यांच्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक किशोर दराडे बंधूंनी यांनी या गटावर विकासकामांचा सपाटा लावला आणि वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. परंतु माजी आमदार मारोतराव पवार व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचेही समर्थक या गटात आहेत. या गटाचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठेभोवती फिरण्याचा इतिहास आहे.
या भागातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा असून, ममदापूर येथील मेळाचा बंधारा हा चाळीस वर्षे झाली तसा निवडणुकीचा मुद्दा आहे. गेल्या वर्षी आमदार छगन भुजबळ यांनी साडेसहा कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु सदर बंधारा हा वनविभागाच्या हद्दीत असल्याने जमीन हस्तांतरण बाकी असल्याने निधी पडून आहे. तसेच देवदरी येथील देवनाचा प्रकल्प हा अपूर्ण आहे. राजापूर येथे रुग्णालय तसेच या भागात प्रत्येक गावाना जोडणारे रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह मोठ्या प्रमाणावर कामे केली आहे, ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे.