टमाटा बाजारभाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:47 AM2017-07-28T00:47:26+5:302017-07-28T00:48:01+5:30
टमाटा बाजारभाव घसरले
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : तब्बल पंधरवड्यापासून तेजीत असलेल्या टमाट्याच्या दरात जवळपास पन्नास टक्क्यांनी घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. नारायणगाव, पुणे, खेड, मंचर या बाजार समितीत स्थानिक टमाटा माल दाखल होत असल्याने बाजारभाव घसरलेले आहेत.
हंगामात १० ते १५ रुपये प्रति किलो दराने विक्री होणाऱ्या टमाट्याची आवक वाढली, तर किलोला २ रुपये असाही दर यापूर्वी मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी टमाट्याची आवक घटल्याने बाजारभाव गगनाला भिडले होते. बाजार समितीत टमाट्याच्या २० किलो वजनाच्या जाळीला १५०० ते १६०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता, तर किरकोळ बाजारात टमाटा १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
किलोला १०० रुपये असा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला असल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले होते, तर वाढत्या बाजारभावामुळे ग्राहकांना किलोभर टमाटा खरेदी करण्यापेक्षा १० ते १५ रुपयांचे तीन ते चार टमाटे खरेदी करण्याची वेळ आली होती. टमाट्याची आवक घटल्याने परराज्यात तसेच परदेशातील टमाटा मालाची निर्यात घटली होती. काही दिवसांपासून पुणे, खेड, मंचर या भागातून टमाटा माल स्थानिक बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत असल्याने बाजारभाव घसरलेले आहेत.