तमाशा फड रंगणार ‘ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 01:21 AM2021-12-15T01:21:37+5:302021-12-15T01:22:06+5:30
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नियमांच्या आधीन राहून सादरीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतरही पोलिसांकडून मात्र तमाशाला खेळाला परवानगी मिळत नसल्याने तमाशा कलावंत अडचणीत आले हेाते. या प्रकरणाची राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर आता राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना परवानगी देण्याबाबतचे आदेश दिल्याने तमाशा खेळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक: कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नियमांच्या आधीन राहून सादरीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतरही पोलिसांकडून मात्र तमाशाला खेळाला परवानगी मिळत नसल्याने तमाशा कलावंत अडचणीत आले हेाते. या प्रकरणाची राज्याच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर आता राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना परवानगी देण्याबाबतचे आदेश दिल्याने तमाशा खेळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात सर्व प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम सुरू झालेले असताना पोलीस खात्याकडून मात्र तमाशाच्या खेळासाठी परवानगी मिळत नसल्याने तमाशा कलावंत आर्थिक अडचणीत सापडले होते. तमाशा सादरीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारली जात असल्याने तमाशा कलावंतांच्या तालमीदेखील थांबल्या होत्या. कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने मराठी तमाशा लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर राज्य शासनाला जाग आली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खाठगे, डॉ. गणेश चंदनशिवे, तमाशा परिषदेचे संभाजीराजे जाधव यांची बैठक झाली. राज्याचे पोलीस उपमहासंचालक सुहास वारके यांनादेखील बैठकीला बोलविण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर पोलीस महानिरीक्षकांच्या स्वाक्षरीने सर्व पोलीस अधीक्षकांना तमाशाला नियमांच्या आधीन राहून परवानगी देण्याबाबतचे आदेश काढले. त्यामुळे तमशा खेळाच्या परवानगीचा अडसर आता दूर झाला आहे.
--कोट०--
गेल्या दोन वर्षांपासून गावगाड्यातील तमाशा कलावंतांना पोलिसांकडून परवानगी नाकरली जात होती. सर्वत्र मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू असताना तमाशा कलावंतांची अडवणूक होत असल्याने मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. आता गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षकांनी थेट आदेश दिल्यामुळे लोककलावंतांना दिलासा मिळाला आहे.
- संभाजीराजे जाधव, अध्यक्ष, मराठी तमाशा लोककलावंत परिषद