तामिळनाडूच्या टोळीने शेतकऱ्यांना घातला ६० लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 01:25 AM2022-02-23T01:25:11+5:302022-02-23T01:25:36+5:30
तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ भामट्यांच्या टोळीने जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येत सुमारे ६० लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
नाशिक : ‘तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ भामट्यांच्या टोळीने जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येत सुमारे ६० लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
देवळा तालुक्यातील गिरणारा व अन्य काही गावांमध्ये काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या कृष्णगिरीच्या ‘श्री लक्ष्मी गणपती नर्सरी गार्डन’चे नाव घेत आठ संशयित शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. त्यांनी ‘आम्ही तुम्हाला शासकीय अनुदान चंदनाच्या लागवडीवर मिळवून देतो, चंदनाची रोपेही पुरवितो’ असे सांगून विविध प्रलोभने व आश्वासने दिली. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत सुमारे साठ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळून ही टोळी फरार झाली. याप्रकरणी गिरणारा गावात राहणारे विनोद कौतिक खैरनार यांना आपली व अन्य काही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी देवळा पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. पाटील यांनी तत्काळ याप्रकरणी देवळा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच तामिळनाडू येथील कृष्णगिरी कुप्पम रोडवरील ‘श्री लक्ष्मी गणपती नर्सरी गार्डनचे संशयित आनंद, नायडू, पी. सुब्रमण्यम नायडू व्यंकटाई पोथुरी यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--कोट--
चंदनाची रोपे पुरविण्याचे सांगून हजारो ते लाखो रुपये उकळणाऱ्या तामिळनाडूच्या संशयितांचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती कोणत्याही शेतकऱ्याकडे असल्यास त्वरित देवळा पोलिसांना द्यावी. तसेच अशाप्रकारे अजून कोणा शेतकरी बांधवांची फसवणूक झाली असल्यास पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याहीप्रकारे अनोळखी व्यक्तींच्या प्रलोभनांना बळी पडू नये व कुठल्याही स्वरुपाचे आर्थिक व्यवहार करू नयेत.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक