माझी दिल्लीत ओळख, तुम्हाला राज्यपाल करतो; नाशिकच्या ठगाने तामिळनाडूतील शास्त्रज्ञाला ५ कोटींना फसवले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 12:06 PM2024-12-11T12:06:21+5:302024-12-11T12:07:04+5:30
निरंजन कुलकर्णी याच्या नावानेदेखील चार ते पाच बँकांचे खाते असल्याचे चौकशीत समोर आले. त्यातील आर्थिक व्यवहार आता तपासला जात आहे.
नाशिक : राजकीय नेत्यांसोबत दिल्लीपर्यंत संबंध असल्याचे भासवून राज्यपालपद मिळवून देतो, असं सांगून तामिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी अपुरी यांची ५ कोटी रुपये घेऊन नाशिकमधील एका व्यक्तीने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. निरंजन सुरेश कुलकर्णी असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी कुलकर्णी याच्या बँकेचे खाते मंगळवारी पुन्हा तपासण्यात आले आहे. यात त्याचे एटीएम व विविध चार बँकांचे पासबुक जप्त करण्यात आले असून, या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
निरंजन कुलकर्णी याच्या नाशिकरोड येथील घराची मंगळवारी यंत्रणांकडून झडती घेण्यात आली. त्यात पथकाला महत्त्वाचे दस्तावेज आढळून आले आहेत. फसवणुकीच्या पैशातून कुलकर्णीने गोशाळा, शेती, फ्लॅट खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली असून, बँक खाते सील करण्यात आले आहे. राज्यपालपद मिळवून देण्यासाठी नरसिम्हा रेड्डी अपुरी (५६) यांच्याकडून १५ कोटींची मागणी कुलकर्णी याने केली होती. त्यानंतर पाच कोटी रुपये देण्याचे ठरले. फिर्यादी रेड्डी यांच्याकडून कुलकर्णी याने वडिलांच्या बँक खात्यावर दोन कोटी रुपये मागविल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी हे बँक खाते तत्काळ गोठविले. तर स्वतः निरंजन कुलकर्णी याच्या नावानेदेखील चार ते पाच बँकांचे खाते असल्याचे चौकशीत समोर आले. त्यातील आर्थिक व्यवहार आता तपासला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात कुलकर्णी अटकेत असून, त्याला या प्रकरणात अन्य कोणाची साथ आहे का? याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. नरसिम्मा रेड्डी अपुरी याची व कुलकर्णी याची नाशिक येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. मोठ्या राजकीय नेत्यांसोबत ओळख असल्याचे सांगून काही मंत्र्यांसोबत काढलेले फोटोदेखील कुलकर्णी याने दाखविले होते. मात्र, अधिक माहिती देण्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.