‘जीएसटी’च्या पोर्टलशी छेडछाड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:10 PM2020-01-20T23:10:16+5:302020-01-21T00:16:05+5:30
विविध क्षेत्रांतील व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटीआर-३ बी रिटर्न भरण्याची सोमवारी (दि.२०) अखेरची मुदत असल्यामुळे एकीकडे रिटर्न भरण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे काही करदात्यांना जीएसटीचा पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड करून करत्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय नाशिकमधील काही व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
नाशिक : विविध क्षेत्रांतील व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटीआर-३ बी रिटर्न भरण्याची सोमवारी (दि.२०) अखेरची मुदत असल्यामुळे एकीकडे रिटर्न भरण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे काही करदात्यांना जीएसटीचा पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड करून करत्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय नाशिकमधील काही व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे काही करदात्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी त्यांची जीएसटी नोंदणी रद्द केलेली असतानाही त्यांना ओटीपी आल्याने नाशिकमधील व्यावसायिकांमध्ये जीएसटी पोर्टल हॅक झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
नाशिकमधील काही जाहिरात व्यावसायिक आणि कर सल्लागारांना जीएसटी पोर्टलवरून तुन्ही तुमचा यूजर आयडी व पासवर्ड विसरला आहात. पुन्हा रिसेट करण्यासाठी दिलेला ओटीपी वापरा, असा संदेश प्राप्त झाले. विशेष म्हणजे यातील एकाही करदात्याने त्याचा जीएसटी रिटर्न भरण्यासाठी पोर्टलवर लॉगीन केलेले नसतानाही अशाप्रकारचे एसएमएस आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड होत असून, करदात्यांची गोपनीय माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागल्याचा संशय राजेश कुलकर्णी, मंगेश करंदीकर आदी करदात्यांसह सनदी लेखापाल सनी मनियार यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे करदात्यांची गोपनीय माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागल्यास करदात्यांना व्यावसायिक आणि आर्थिक फटका बसण्याची भीतीने व्यावसायिकां-कडून व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधला असता अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप जीएसटी विभागाला प्राप्त झाली नसून जीएसटी करदात्यांना काही अडचण असल्यास त्यांनी प्रादेशिक जीएसटी आयुक्तालयातील सेवा केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
कोणतीही तक्रार प्राप्त नाही
जीएसटी पोर्टल संथगतीने सुरू असल्याने लॉग इन होऊ शकत नव्हते. या व्यतिक्त पोर्टलशी संबंधित कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, जीएसटी पोर्टलवरून ओटीपी गेले असतील ते कोणत्या संदर्भात आहेत याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे जीएसटीचे सहायक आयुक्त चेतन पवार यांनी सांगितले.
जीएसटी पोर्टलवरून रविवारी रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी ओटीपी आला, याचा अर्थ जीएसटी पोर्टलशी कोणीतरी छेडछाड केली आहे. त्याशिवाय असा ओटीपी येणार नाही. ओटीपी येताच सीएला फोन केला. त्यांनी जीएसटी संदर्भात काहीही काम केले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोर्टलशी कोणीतरी छेडछाड केल्याचा संशय निर्माण झाला आहे.
- राजेश कुलकर्णी, जीएसटी करदाता
जीएसटी पोर्टलवर कोणतेही काम सुरू नसताना पहाटे साडेपाच वाजता ओटीपी आला. जीएसटी पोर्टलशी छेडछाड झाल्याशिवाय अशाप्रकारे लॉगीन न करता ओटीपी येऊ शकत नाही. त्यामुळे झालेला प्रकार गंभीर आहे. करदात्यांनी त्यांची मोठी रक्कम त्यांच्या खात्यावर डिपॉजिट केलेली असते. ही रक्कम परस्पर गायब होण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे.
-सनी मनियार, सनदी लेखापाल