हुल्लडबाजी करणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद
By admin | Published: August 3, 2015 11:44 PM2015-08-03T23:44:04+5:302015-08-03T23:44:38+5:30
चोख पोलीस बंदोबस्त : आसारामबापू पुलावर रायडिंगला खाकीस्टाइल ‘ब्रेक’
नाशिक : ‘फ्रेण्डशिप डे’च्या नावाखाली आसारामबापू पूल ते आनंदवली पुलापर्यंतच्या गोदाकाठ रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी दुपारच्या सुमारास दंडुक्याचा प्रसाद दिला.
सकाळपासूनच आसारामबापू पुलाच्या परिसरात तरुण-तरुणींची गर्दी झाली होती. पुलावर उभे राहून गोदाकाठच्या पात्राचे बॅग्राऊंड ‘सेल्फी’ काढताना तरुण-तरुणींचे ग्रुप दिसत होते. तसेच बहुतांश कॉलेजकुमार महागड्या दुचाकी-चारचाकी भरधाव वेगाने दामटवित स्टंटबाजी करत असल्याची माहिती दुपारच्या सुमारास गंगापूर पोलिसांना मिळाली. तसेच तरुणांचे दोन गट आसारामबापू पुलावर समोरासमोर येऊन हाणामारीच्या तयारीत असल्याची कुणकुण गुन्हे शोध पथकाला लागली होती. त्यामुळे दुपारी एक वाजेपासूनच गंगापूर पोलिसांनी आनंदवली पुलापासून आसारामबापू पुलापर्यंत पोलीस गस्त वाढविली होती. तसेच येथील गोदापार्कच्या आवारात आठ ते दहा पोलीस कर्मचारी संध्याकाळी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, बीट मार्शलचीही गस्त या भागात सुरू ठेवण्यात आली होती. दुपारनंतर सुरू असलेली कॉलेजकुमारांच्या रायडिंगला पोलिसांनी खाकीस्टाइल ‘ब्रेक’ लावला. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या बहुतांश तरुणांच्या टोळक्याला पोलिसांनी दंडुक्याने पिटाळून लावले. एकूणच मैत्रीदिनाच्या औचित्यावर उन्माद करणाऱ्या टवाळखोर कॉलेजकुमारांना पोलिसांनी चोप दिला.
संध्याकाळी मखमलाबादरोडपासून आनंदवलीकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. सहा वाजता या ठिकाणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी आडवी लावून दुचाकी व चारचाकी अशा सर्वच वाहनांना आनंदवलीकडे जाण्यासाठी प्रवेश बंद केला होता. संध्याकाळच्या वेळेस बहुतांश चारचाकी वाहनांचीदेखील पोलिसांनी तपासणी करत वाहनांमधून मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. बहुतांश युवक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवित असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी रात्रीपर्यंत या ठिकाणी कारवाई सुरूच ठेवली होती. थेट सोमेश्वर धबधबा, कानेटकर उद्यानापर्यंत पोलीस गस्तमध्ये गंगापूर पोलिसांकडून वाढ करण्यात आली होती. (प्रतिनिधी)