नाशिक जिल्ह्यात टॅँकरने अडीचशेचा टप्पा ओलांडला
By श्याम बागुल | Published: May 2, 2019 03:04 PM2019-05-02T15:04:26+5:302019-05-02T15:05:03+5:30
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. साधारणत: आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. परंतु जलयुक्त शिवार योजनेचा जिल्ह्यात ढिंडोरा पिटला जात असताना टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास प्रशासनाचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे प्रशासनाने ग्रामीण भागात टॅँकर सुरू करण्यास चालढकल चालविली होती. अखेर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा दबावामुळे प्रशासनाने फेब्रुवारीत टॅँकर सुरू केले. मार्च महिन्यापासून दर आठवड्याला टॅँकरची संख्या वाढू लागली असून, एप्रिल अखेरपर्यंत ही संख्या २५६ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर व येवला या आठ तालुक्यातील २०७ गावे व ६९४ वाड्या अशा ९०१ गावांतील सुमारे पाच लाख लोकवस्तीला पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. टॅँकरबरोबरच १०१ खासगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या विहीरीतून गावासाठी पिण्याच्या पाण्याची तसेच काही गावांसाठी टॅँकर भरण्याच्या कामी या विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.