यंदा दोनच गावांचे टॅँकरचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:26 PM2020-05-18T21:26:56+5:302020-05-19T00:28:02+5:30

सिन्नर : अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशाप्रकारे एकूण २९७ ठिकाणी ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

Tanker proposals from only two villages this year | यंदा दोनच गावांचे टॅँकरचे प्रस्ताव

यंदा दोनच गावांचे टॅँकरचे प्रस्ताव

Next

सिन्नर : (सचिन सांगळे) अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशाप्रकारे एकूण २९७ ठिकाणी ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू असल्याने नागरिक घरीच आहे.
तालुक्याच्या सर्वच भागात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामीण भागात केटिवेअर, बंधारे, विहिरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे यावर्षी वाड्या-वस्त्यांमध्ये अद्याप पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे शासकीय कार्यालयांंमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा अशा परिस्थितीत तालुक्यात पाणीटंचाई नसल्याने पाणीपुरवठा विभाग निवांत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा सुरू होत असत. त्यामुळे प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती होती. तसेच पावसाचेही प्रमाण कमी होते. २४ मार्च रोजी सिन्नर तालुक्यात पहिला टॅँकर सुरु झाला होता. तब्बल १६ महिने ६५ टँकरद्वारे तालुक्यातील जनतेची तहान भागविली जात होती. अनेक गावांमध्ये शासनाचा टँकर आल्यानंतरच पिण्याचे पाणी येत होते. २६ जुलै २०१९ ला तालुक्यातील सर्व पाण्याचे टँकर बंद केले असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
यावर्षी तालुक्यातील सोनगिरी व सुळेवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाला होता. सोनगिरीला कोनांबे धरणातून तर सुळेवाडीला बारागाव पिंप्री योजनेतून पाणी उपलब्ध करून दिले आहे.
दरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागातून टँकरची मागणी होत असते. त्या भागातही गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने अद्यापपर्यंत टँकरची मागणी आलेली नाही. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांत तालुक्यातील अनेक गावांत मुख्यमंत्री पेयजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याने पाणीटंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत.
-----------------------------------
सात पाणी योजनांचा आधार : सिन्नर तालुक्यात युती शासनाच्या काळात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आल्या. आजमितीला तालुक्यात सात नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याने हजारो ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. यामध्ये मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह ५ गावे, वावीसह ११ गावे, वडांगळीसह १३, ठाणगावसह ५, बारागाव पिंप्रीसह ७ व नायगावसह ९ गावे आदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. पाणीपुरवठा योजनांमुळे भरउन्हाळ्यातही नागरिकांना दिलासा मिळत आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने महिलांना पायपीट करावी लागली नाही.
-----------------------
भोजापूर धरणात
९ टक्के साठा
सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १५० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील पाचही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट साठा असून, त्यावर कणकोरीसह ५ गावे व मनेगावसह १६ गावे नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. तसेच उंबरदरी, बोरखिंड, कोनांबे, सरदवाडी, दातली, दुशिंगपूर, माळवाडी या मध्यम प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. गेल्यावर्षी धरणात चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Web Title: Tanker proposals from only two villages this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक