नोव्हेंबरमध्येच ३४० गांवाना टँकरचे पाणी; नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर
By Sandeep.bhalerao | Published: November 7, 2023 06:47 PM2023-11-07T18:47:50+5:302023-11-07T18:47:59+5:30
येवला तालुक्यातही ३५ गावे आणि १५ वाड्यांना पाण्याचे टँकर्स सुरू आहेत.
नाशिक : एकीकडे जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मुद्यावर पेच निर्माण झालेला असताना नाशिक जिल्ह्यात पाण्याची टंचाई असलेल्या ३४० गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. कमी झालेले पर्जन्यमान आणि धरणांमधील कमी साठा यामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. सात तालुक्यांमध्ये नोव्हेंबरमध्येच टँकरबद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असल्याने दुष्काळी स्थितीचा अंदाज येत आहे. सद्यस्थितीत ९८ टँकरद्वारे ३४० गाव-वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी स्थिती निर्माण झालेल्या नांदगाव तालुक्यातील १९६ गावांचा समावेश आहे. नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश असल्याने त्याविरुद्ध सर्वपक्षीय आमदारांनी विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. कमी पाऊस झालेल्या बागलाण, चांदवड, देवळश, मालेगाव, नांदगाव, सिन्नर आणि येवला या तालुक्यांमधील २३६ वाड्या आणि १०४ गावे यामध्ये पाण्याचे टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवत आहेत. नांदगाव तालुक्यातील सर्वाधिक ३४ गावे आणि १६२ वाड्यांचा समावेश आहे. येवला तालुक्यातही ३५ गावे आणि १५ वाड्यांना पाण्याचे टँकर्स सुरू आहेत.