समृद्धी महामार्ग सुरू होण्याच्या आतच अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:23 AM2023-01-18T10:23:00+5:302023-01-18T10:24:46+5:30
नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे.
शैलेश कर्पे
सिन्नर (नाशिक) : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण होण्यापूर्वीच वाहने सुसाट वेगाने जाऊ लागली आहेत. सिन्नर तालुक्यात गोंदे ते सोनारी दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत समृद्धी महामार्गावर तरस ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे. तथापि, दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी ते मुंबई समृद्धी महामार्ग अद्याप कामे अपूर्ण असल्याने सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावर केवळ कामासाठी वापरण्यात येणारे डंपर व अन्य वाहने चालतात. याव्यतिरिक्तही काही चोरी -चुपके वाहने या मार्गावर धावत असल्याचे दिसते. बुधवारी पहाटे किंवा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरस ठार झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरसाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर दुतर्फा भिंती उभारण्यात आल्या आहेत. महामार्गावरती बॅरिकेटिंगही करण्यात आले आहे. असे असतानाही तरस महामार्गावर गेले आणि महामार्गाचे लोकार्पण सुरू झाले नसतानाही अज्ञात वाहनाने तरसाला धडक दिली. या घटनेची माहिती सिन्नरच्या वनपरिक्षेत्रअधिकारी मनीषा जाधव यांना देण्यात आली आहे.