१४ लाख रोपांच्या लागवडीचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 01:05 AM2021-06-14T01:05:24+5:302021-06-14T01:05:44+5:30

पावसाळ्याला सुरुवात झाली असून, वन विभागाकडून वन महोत्सव राबविला जाणार असून, या औचित्यावर वन विभागाकडून जिल्ह्यात सुमारे १४ लाख १७ हजार ४१२ रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, खड्डे खोदण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

The target is to plant 14 lakh saplings | १४ लाख रोपांच्या लागवडीचे ध्येय

१४ लाख रोपांच्या लागवडीचे ध्येय

googlenewsNext
ठळक मुद्दे वनमहोत्सवाची जय्यत तयारी : खड्डे खोदून पूर्ण; रोपांची मुबलक उपलब्धता

नाशिक : पावसाळ्याला सुरुवात झाली असून, वन विभागाकडून वन महोत्सव राबविला जाणार असून, या औचित्यावर वन विभागाकडून जिल्ह्यात सुमारे १४ लाख १७ हजार ४१२ रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, खड्डे खोदण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

वनीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रांमध्ये वाढ करण्याकरिता यावर्षी राज्य शासनाच्या आदेशानुसार वन महोत्सव १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पार पाडला जाणार आहे. यासाठी वनविभागाकडे रोपांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असून, मागील वर्षीदेखील वृक्षारोपण कोरोनाच्या लाटेमुळे होऊ शकले नव्हते. त्यामुळे शासकीय रोपवाटिकांमध्ये हजारोंच्या संख्येने रोपे ‘जैसे-थे’ पडून आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नाशिक पश्चिम, पूर्व प्रादेशिक वनविभागासह सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळाकडून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी या तीनही विभागांनी रोपे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मान्सूनपूर्व सरींनी मागील काही दिवसांपासून उघडीप दिली आहे. पर्यावरण दिनापासून पुढे दोन ते तीन दिवस पावसाने हजेरी लावली. मात्र, पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने १५ जूनपासून सुरू होणारा वन महोत्सव कदाचित जूनअखेरीस सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

--इन्फो--

वन महोत्सवात सवलतीच्या दरात रोपे

वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभागाकडून वन महोत्सवांतर्गत नागरिकांना वृक्षारोपणासाठी सवलतीच्या शासकीय दरांमध्ये रोपे विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक पी.टी. मोराणकर यांनी दिली. नागरिकांनी, तसेच विविध सामाजिक संघटनांनी वनविकास महामंडळाच्या कार्यालयातून रोपे खरेदी करून योग्य ठिकाणी लागवड करीत त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

---इन्फो--

विभागनिहाय वृक्षारोपणाचे उद्दिष्ट असे...

पश्चिम वनविभाग- ४ लाख २१ हजार ५०० (क्षेत्र-३०० हेक्टर)

सामाजिक वनीकरण- ६ लाख २ हजार १६२ (क्षेत्र-५४२ हेक्टर)

वनविकास महामंडळ- ३ लाख ९३ हजार ७५० (क्षेत्र-१८० हेक्टर)

---इन्फो---

संवर्धनाची जबाबदारी निश्चित

लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित विभागांवर सुरुवातीची काही वर्षे निश्चित करण्यात आली आहेत. रोपवनाची सुरक्षितता आणि अधिकाधिक रोपे जिवंत ठेवण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यावर सामाजिक वनीकरण विभागाकडून सुरुवातीची तीन वर्षे, तसेच वनविकास महामंडळाकडून पहिली पाच वर्षे, तर प्रादेशिक वन विभागाकडूनही पाच वर्षांपर्यंत रोपवनाचे संवर्धन केले जाते.

--इन्फो--

...या रोपवाटिकांमधून होणार पुरवठा

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गोदाकाठावरील सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेत मुुबलक रोपे उपलब्ध आहेत, तसेच गोवर्धन येथील पश्चिम नाशिक प्रादेशिक विभागाच्या रोपवाटिकेतही रोपांचे संगोपन करण्यात आले आहे. वनविकास महामंडळाच्या मखमलाबाद येथील गंधारवाडी रोपवाटिकेतूनही रोपांचा पुरवठा होणार आहे. जिल्ह्याबाहेरील तालुकास्तरावरील रोपवाटिकांमध्येही रोपे तयार करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: The target is to plant 14 lakh saplings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.