उद्दिष्ट १०९ कोटींचे, वसुली अवघी ३८ कोटींची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:47 AM2019-03-13T00:47:17+5:302019-03-13T00:48:21+5:30
चालू वर्षीच्या सुधारित उद्दिष्टापोटी महापालिकेला ५५ कोटी रुपयांची गरज असली तरी प्रत्यक्षात मात्र ३८ कोटी ७० लाख रुपयांचीच वसुली झाली आहे. त्यामुळे थकबाकीसह १०९ कोटी रुपयांची वसुली कधी होणार हा प्रश्नच आहे.
नाशिक : चालू वर्षीच्या सुधारित उद्दिष्टापोटी महापालिकेला ५५ कोटी रुपयांची गरज असली तरी प्रत्यक्षात मात्र ३८ कोटी ७० लाख रुपयांचीच वसुली झाली आहे. त्यामुळे थकबाकीसह १०९ कोटी रुपयांची वसुली कधी होणार हा प्रश्नच आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासाठी सुमारे ५३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते, तर गेल्या वर्षीपर्यंतच थकबाकी ५५ कोटी रुपये तसेच अन्य सर्व हिशेब करता १०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. चालू वर्षीची वसुलीच अद्याप पूर्ण झालेली नसून निम्मा मार्च महिना संपत आला तरी शंभर टक्के वसुली झालेली नाही. महापालिकेच्या पाणीपट्टी विभागाच्या वतीने गेल्या महिन्यापर्यंत ३३ हजार नोटिसा दिल्या होत्या, त्यात आणखी नोटिसांची भर टाकणे सुरू आहे. जास्तीत जास्त घरपट्टी वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरूच आहेत आत्तापर्यंत शंभर कोटी रुपयांच्या वर वसुली केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच घरपट्टीने शंभर कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे, घरपट्टी वसुलीसाठी यापूर्वी २५७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र करवाढीच्या निर्णयातील घोळामुळे नंतर ते दीडशे कोटीपर्यंत घसरविण्यात आले.