गणपूर्तीअभावी नाशिक बाजार समितीची बैठक तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 07:31 PM2019-09-02T19:31:56+5:302019-09-02T19:32:07+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाचखोर सभापती चुंभळे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांना धोरणात्मक आणि आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये अन्यथा सचिव जबाबदार असतील, असे पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी लाच घेतल्याने सहकार खात्याने त्यांचे सह्यांचे अधिकार काढल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी उपनिबंधकांनी दिलेल्या पत्राच्या आधारे बाजार समिती संचालकांची सोमवारी बोलाविण्यात आलेल्या विशेष बैठकीकडे उपसभापती युवराज कोठुळे यांच्यासह काही संचालकांनी पाठ फिरविल्यामुळे गणपूर्तीअभावी बैठक तहकूब करावी लागली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाचखोर सभापती चुंभळे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांना धोरणात्मक आणि आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये अन्यथा सचिव जबाबदार असतील, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक कृषी बाजार समितीला दिले होते. या पत्रावर निर्णय घेण्यासाठी उपसभापती कोठुळे यांनी पत्र काढून सोमवारी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला शंकर धनवटे, दिलीप थेटे, विश्वास नागरे, संजय तुंगार, तुकाराम पेखळे, हेमंत खंदारे, हंसराज वडघुले, रवि भोये, सुनील खोडे हे सदस्य उपस्थित होते. त्यात काही शासन नियुक्त सदस्य असल्याने त्यांना चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार आहे, मात्र मतदानाचा अधिकार नाही असे कारण सचिव काळे यांनी दिले व गणपूर्तीअभावी सभा तहकूब केली जाईल, असे सांगताच अन्य संचालकांनी आक्षेप घेतला. सचिव काळे हे सभापती चुंभळे गटाचे असल्याने केवळ त्यांना वाचविण्यासाठी बैठक तहकूब करत असल्याचा आरोप केला. अखेर गणपूर्ती नसल्याने बैठक तहकूब करत येत्या गुरुवारी (दि.५) पुन्हा सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी बैठक सुरू झाल्यानंतर उपस्थित संचालकांनी सचिव काळे यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर बैठक सुरू असताना एक-दोन वेळा बैठकीला दांडी मारणाऱ्या उपसभापती कोठुळे यांनी अन्य एका इसमाच्या मोबाइलवर संपर्क साधून सचिव काळे यांच्याशी बातचीत केल्याने तो चर्चेचा विषय ठरला. दरम्यान तातडीची बैठक बोलाविणा-या उपसभापती कोठुळे यांनी सदर सभा बेकायदेशीर असल्याने आणि कोरम पूर्ण नसल्याने बैठक होणार नसल्याचे बैठक सुरू होण्यापूर्वीच प्रसार माध्यमांना स्पष्ट केले. त्यामुळे बाजार समितीला सुट्टी असताना बैठक बोलाविली कशी असा सवाल उपस्थित संचलकांनी केला. तर सदर बैठक केवळ चुंभळे गटाला हादरा देण्यासाठी पिंगळे गटाच्या पुढाकाराने बोलाविली असल्याची चर्चा संचालकांत सुरू होती. तसेच चुंभळे यांच्या गैरहजेरीत सह्यांचे अधिकार अन्य संचालकांना मिळावे यासाठी बैठक बोलाविण्यात आल्याचे बोलले जात होते.