निफाड तालुक्यातील करवसुली निम्म्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:39 IST2021-03-04T21:06:28+5:302021-03-05T00:39:14+5:30
सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ निम्मी करवसुली झाली आहे.

निफाड तालुक्यातील करवसुली निम्म्यावर!
सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ निम्मी करवसुली झाली आहे.
वार्षिक ताळेबंद हा मार्च महिन्यात असतो. दरवर्षी मार्च महिना सुरू होईपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी थकीत आणि चालू वर्षाचे कर भरत असतात. यंदा मात्र मार्च महिना सुरू झाला असला तरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व कर भरण्यास नागरिकांची टाळाटाळ सुरू आहे. वर्षभर असणारा कोरोना आणि त्यामुळे गेलेली हातातील कामे यामुळे चार पैसे गाठीशी आले नाहीत, बेरोजगारी वाढली, कुटुंब चालवणे अवघड असताना कर कुठून भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. द्राक्ष शेती सलग दुसऱ्या वर्षी तोट्यात आहे. खर्चसुद्धा वसूल होत नाही, अशा परिस्थितीत बँक कर्ज, मुलांचे लग्न, घर खर्च, शिक्षण, दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे.
ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळत नाही, त्यामुळे पैसे कोठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे.
ग्रामपंचायत वर्षभर जमा होणाऱ्या करातून कर्मचाऱ्यांचे पगार, पाणी पुरवठा, किरकोळ दुरुस्ती, लाईट बिल, फर्निचर, स्टेशनरी अशी कामे करीत असते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच यांच्या मर्जीतील दोन किंवा तीन माणसांना कर्मचारी म्हणून घेतले आहे. आज पगार वेळेत होत नसल्याने तेच कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.
कधी नव्हे; इतका ग्रामपंचायत कर थकीत झाला आहे. विविध कारणांनी नागरिक अडचणीत आले असले तरी ग्रामपंचायत ही आपल्या गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. वसुली झाली नाही तर कामे करणे अवघड होईल, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
- संदीप कराड, गटविकास अधिकारी पंचायत समिती, निफाड.
सन एप्रिल २०२० ते मार्च २०२१
घरपटीचे उद्दिष्ट
१५ कोटी ४४ लाख
झालेली वसुली
७ कोटी ८४ लाख
पाणीपट्टीचे उद्धिष्ट
७ कोटी २५लाख
झालेली वसुली
३ कोटी२२ लाख
थकीत रक्कम
११ कोटी