द्राक्षांवर करपा, कांद्यावर दिसू लागली फूलकीड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 02:36 AM2022-01-13T02:36:23+5:302022-01-13T02:36:43+5:30
सततच्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, तर एक-दोन महिन्याच्या कांदा पिकावर फूलकीड दिसू लागली असून काही ठिकाणी जमिनीत बुरशी तयार झाल्याने तयार किंवा काढणीयोग्य कांदा सडू लागल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करून या रोगांचा प्रादुर्भाव रोखावा असा सल्ला देण्यात आला आहे. जेथे गव्हाची अगाद पेरणी झाली आहे तेथे ओंबी बारीक राहिल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे
नाशिक : सततच्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, तर एक-दोन महिन्याच्या कांदा पिकावर फूलकीड दिसू लागली असून काही ठिकाणी जमिनीत बुरशी तयार झाल्याने तयार किंवा काढणीयोग्य कांदा सडू लागल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करून या रोगांचा प्रादुर्भाव रोखावा असा सल्ला देण्यात आला आहे. जेथे गव्हाची अगाद पेरणी झाली आहे तेथे ओंबी बारीक राहिल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या हवामानाच्या खेळामुळे वातावरणात गारव्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष आणि कांदा ही पिके संकटात आली आहेत. द्राक्षांच्या मणी वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या भागात डिसेंबरमध्ये पाऊस पडला आहे, त्या भागातील काही द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रात काही नमुने तपासणीसाठी आले असल्याने त्यास दुजोरा मिळत आहे. सकाळी पडणारे दव आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण यामुळे नवीन बागांवर डावणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लेट छाटणीच्या बागांना सध्या तरी फारसा धोका दिसत नाही. ढगाळ वातावरणामुळे जमिनीत बुरशी वाढू लागली आहे. यामुळे जमिनीत कांदा सडू लागल्याची उदाहरणेही समोर येऊ लागली आहेत.
रब्बीतील गहू आणि हरभरा या पिकांना फारसा धोका नसला तरी, मध्यंतरीच्या पावसामुळे काही ठिकाणी गव्हाचे तुरे पिवळे पडल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. कडक ऊन पडल्यानंतर ते गहू पुन्हा पूर्वपदावर येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फुलोऱ्यात येणाऱ्या हरभऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस अळी पडण्याची शक्यता असते. यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी, असा सल्ला दिला जात आहे.
१५ पासून पाहणी
बदलत्या हवामानामुळे गव्हावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आणि रोगांची माहिती घेण्यासाठी निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्यावतीने येत्या १५ जानेवारीपासून जिल्ह्याच्या विविध भागात पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना रोगनियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच औषध फवारणीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.