आग दुर्घटना : भीमवाडीतील 'ते' कुटुंब अठरा दिवसांपासून मैदानातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:51 PM2020-05-13T15:51:38+5:302020-05-13T15:57:09+5:30
गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती. आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीण होते.
नाशिक : गंजमाळ येथील भीमवाडीत आग लागण्याची घटना घडल्यानंतर अठरा दिवस
झाले तरी यात बेघर झालेले कुटुंबिय भालेकर मैदानाच्या जागेतच राहात आहेत.
दरम्यान, त्यांची आता मुळ जागी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येऊ
लागली आहे.
गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती.
आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीण
होते. तरीही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात
आणली आणि जीवीत हानी होऊ दिली नाही. या दुर्घटनेतील बेघर कुटूंबांना
तात्पुरत्या स्वरूपात बी. डी. भालेकर मैदानात आणि महापालिकेच्या एका
शाळेच्या जागेत ठेवण्यात आले आहे. या नागरीकांना शासनाने पाच हजार
रूपयांची तातडीची मदत दिली आहे. तसेच विविध सामाजिक संस्था मदतीने भोजन
आणि अन्य साहित्य दिले जात आहे.
दरम्यान या नागरीकांच्या मदतीसाठी नाशिकमधील सामाजिक संघटनांनी समिती
स्थापन केली आहे. या समितीने या आपदग्रस्तांचे त्यांच्या मुळ जागेवर
पुनवर्सन करावे अशी मागणी या समितीने केली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग
वाढण्याची भीती असल्याने एकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबाना
ठेवणे योग्य नाही तरी त्यांना त्यांच्या मुळ जागी नेऊन पुनवर्सन करावी
अशी मागणी संघटनेच्या वतीन करण्यात आल्याची माहिती किरण मोहिते यांनी
केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालकेचे सहायक आयुक्त बी. जी.
सोनकांबळे व सहायक आयुक्त महेश डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले आहे.