चहा कटिंग सात, तर मिसळ-पाव ५० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:50 AM2019-09-30T00:50:10+5:302019-09-30T00:50:34+5:30
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून प्रचार, सभा, जेवणावळी, मंडप, फलक तसेच वाहने, लायटिंग, फटाके यांसह अनेक बाबींवर खर्च केला जातो. निवडणूक खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांना खर्च करावा लागतो.
नाशिक : विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून प्रचार, सभा, जेवणावळी, मंडप, फलक तसेच वाहने, लायटिंग, फटाके यांसह अनेक बाबींवर खर्च केला जातो. निवडणूक खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांना खर्च करावा लागतो. यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने अंतिम प्रचलित दर निश्चित केले असून, उमेदवारांना कटिंग चहासाठी सात रुपये, तर मिसळ-पावसाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. पाण्याच्या बाटलीपासून ते आइस्क्रीमपर्यंतचा खर्च जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निश्चित केला आहे. त्या मर्यादेतच उमेदवारांना खर्च करता येणार आहे.
निवडणूक खर्चासंदर्भातील जिल्ह्यातील प्रचलित दरांचा विचार करून निवडणूक शाखेने अंतिम दरपत्रक निश्चित केले आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवाराला प्रचाराबरोबरच कार्यकर्त्यांनादेखील सांभाळावे लागते. प्रचारयंत्रणा राबविण्यासाठीही कार्यकर्त्यांची फळी महत्त्वाची असल्याने त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था उमेदवारांकडून केली जाते. निवडणुकीत कार्यकर्ते पोटावर चालतात हे सूत्र आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांवरील खर्चदेखील निवडणुकीत मोठा केला जातो. मतदारसंघातील कार्यकर्त्यांपासून ते प्रचारातील आणि प्रचार कार्यालयातील कार्यकर्त्यांसाठी जेवणावळी दिल्या जातात. त्यांचा हिशेब उमेदवाराला मांडावा लागतो. यासाठीचे दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
जेवणावळीसाठी हॉटेल्सची रूम, गेस्ट हाउस घेतले असेल तर २००० रुपये प्रतिदिन याप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. पाण्याचा टॅँकर वापरला जाणार असेल तर ६००० लिटर पाण्याच्या प्रतिटॅँकरसाठी ६०० रुपये, तर १२००० लिटर पाण्याच्या टॅँकरसाठी १००० रुपये आकारले जातील.
खाद्यपदार्थांचे दर
पदार्थ दर रुपये
चहा अर्धा ०७
चहा फुल १०
बटर मिल्क/ मिल्म १५
मिनरल वॉटर (बाटली) २०
मिनरल वॉटर (जार) ४०
बिस्कीट १० रुपये नग
वडापाव, समोसा, पाववडा १२
भजी, पोहे, कचोरी, फरसाण, आइस्क्रीम २० रु. (प्रतिनग)
डोसा, उत्तपा ४०
मिसळ पाव, पावभाजी
आइस्क्रीम ५०
पावभाजी ५५
जेवण (डिलक्स थाळी) १२०
जेवण (शाकाहारी) १००
शाकाहारी जेवण गोड पदार्थासह १००
पोळी-भाजी ८०
मांसाहारी जेवण १५०