मुलांना मूल्याधिष्ठित शिक्षण द्या - तुकाराम मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:08 AM2018-06-17T00:08:18+5:302018-06-17T00:08:18+5:30
बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देणे अपेक्षित आहे. केवळ विद्यार्थ्यांना साक्षर बनवून पाट्या टाकण्याचे आणि घोकंपट्टी करण्याची कामे बंद करा, असा स्पष्ट सल्ला देतानाच वर्गात शिक्षकांना आता मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
सातपूर : बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देणे अपेक्षित आहे. केवळ विद्यार्थ्यांना साक्षर बनवून पाट्या टाकण्याचे आणि घोकंपट्टी करण्याची कामे बंद करा, असा स्पष्ट सल्ला देतानाच वर्गात शिक्षकांना आता मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या जिजामाता शाळेत नवागतांच्या स्वागत आणि पाठ्यपुस्तक वाटपाप्रसंगी ते बोलत होते. मुंढे यांनी शिक्षकांना शिस्तीचा पाठ पढविताना सांगितले की, शिक्षकांनी पारंपरिक अभ्यासक्रम शिकविताना मुलांच्या क्षमता, त्यांचे कलागुण, त्यांच्यातील अवगुण ओळखून त्यांना शिक्षण दिले पाहिजे. केवळ साक्षर बनवू नये. शिक्षकांनी अगोदर अभ्यास करावा. शिकविताना शिक्षकांनी नव्हे तर विद्यार्थ्यांनी पुस्तक उघडले पाहिजे. आजपासून शिक्षकांनी शाळेत अर्धा तास अगोदर येऊन स्वच्छता पाहावी. खासगी शाळांपेक्षा मनपा शाळांचा दर्जा उंचावलाच पाहिजे, असेही स्पष्ट केले. मुंढे यांनी सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. प्रत्येकाला नाव विचारून त्यांच्या हातात वही, गुलाबपुष्प आणि चॉकलेट दिले. त्यानंतर प्रत्येकाला फुगा दिला. या चिमुकल्यांसोबत हवेत फुगा उडविण्याची मजा घेतली. एरवी मुंढे यांच्या जवळपासही न फिरकणाऱ्या अधिकाºयांनीही आयुक्तांच्या मजेत आपलीही मजा करून घेतली. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, फरीदा शेख, मुख्याध्यापक रोहिदास गोसावी उपस्थित होते. प्रास्ताविक सूर्यवंशी यांनी, तर सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी केले. मुख्याध्यापक सुनेत्रा तांबट यांनी आभार मानले.
पालकांशी साधला संवाद
जिजामाता शाळेतील पाल्यांना घेण्यासाठी अनेक पालक आलेले होते. यावेळी मुंढे यांनी पालकांना धडे दिले. पाल्यांना शाळेत पाठविताना घ्यावयाची काळजी, स्वच्छता, अभ्यास याविषयी बोलताना पाल्यांचे गणवेश स्वच्छ असावेत, गणवेशाची बटणे तुटलेली नसावीत, शिक्षकांनी काय शिकविले याची विचारणा करावी, वेळोवेळी शिक्षकांची भेट घ्यावी, पालकांनी आपल्या पाल्यासमोर व्यवस्थित राहावे कारण तुम्ही घरात जसे राहाल, वागाल तसेच तुमचा पाल्य तुमचे अनुकरण करीत असतो असे सांगत पालकांची विचारपूस केली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कलागुण आणि क्षमता ओळखून त्यांच्या पालकांशी संवाद साधावा. काही उणिवा असतील तर त्याही पालकांना सांगाव्यात आणि आजपासूनच मुख्याध्यापक वगळता शिक्षकांना वर्गात दिवसभर मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश आयुक्त मुंढे यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांना दिले. तसे परिपत्रक काढण्यासही त्यांनी सांगितले.