शिक्षक पुरस्काराच्या निवडीला अखेर सापडला मुहूर्त
By Admin | Published: September 2, 2016 12:33 AM2016-09-02T00:33:46+5:302016-09-02T00:34:45+5:30
१५ शिक्षकांचे प्रस्ताव आयुक्तांकडे सादर
१५ शिक्षकांचे प्रस्ताव आयुक्तांकडे सादर
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार्या आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या निवडीला अखेर गुरुवारी (दि.१) मुहूर्त सापडला. येथील शासकीय कन्या शाळेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आदर्श शिक्षकांचे प्रस्ताव अंतिम करण्यात आले.
दरवर्षी जिल्ातून १५ तालुक्यांतून १५ आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मागील वर्षी जरा उशिरानेच झालेल्या एका सोहळ्यात केवळ आदर्श शिक्षकच नव्हे तर सर्वच विभागातील पुरस्कारांचे एकत्रित वितरण करण्याचा नवीन प्रयोग करण्यात आला होता. आताही येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होणे जरा अवघडच आहे. गुरुवारी शासकीय कन्या शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंबळे, शिक्षण सभापती किरण पंढरीनाथ थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी उर्मिला धनगर, शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्य सरोज जगताप आदि उपस्थित होते. जिल्ातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण २८ प्रस्ताव आले आहेत. त्यातील १५ प्रस्तावांना अंतिम करण्यात येऊन ते पुरस्कार मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. येत्या ५ सप्टेंबरपूर्वी ते पुरस्कार जाहीर करण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले. काही तालुक्यांतून एकेकच प्रस्ताव आल्याने त्यांनाच अंतिम करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर आली. त्यातही वाढीत मुदत देऊनही विलंबाने सादर करण्यात आलेल्या दिंडोरी व इगतपुरीचे प्रस्ताव स्वीकारावे की नाही, याबाबत संभ्रम होता. (प्रतिनिधी)