शिक्षक मतदारसंघ निवडणूक : उमेदवारांचे समर्थक नाशकात भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:50 PM2018-06-25T13:50:46+5:302018-06-25T14:17:18+5:30
सोशलमिडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्याच्या संशयावरुन समर्थक भिडल्याचे बोलले जात आहे.
नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान सुरू असताना जिल्हा परिषदेजवळील बी. डी.भालेकर शाळेजवळ निवडणुकीच्या रिंगणातील दोन उमेदवारांचे समर्थक आपआपसांत भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तत्काळ हाणामारी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान, निवडणूक रिंगणातील किशोर दराडे, संदीप बेडसे या उमेदवारांच्या दोन समर्थकांमध्ये वादविवाद होऊन हाणामारी झाली. सोशलमिडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्याच्या संशयावरुन समर्थक भिडल्याचे बोलले जात आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या चार आमदारांसाठी मतदान घेतले जात आहे. यामध्ये मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील या निवडणूकीत शिवसेना-भाजपमध्ये लढत आहे. नाशिक विभागासाठी १६ उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शहरातील एका मतदान केंद्राबाहेर मतदान प्रक्रिया सुरू असताना दुपारच्या सुमारास हा प्रकार घडून आला. दराडे-बेडसे समर्थक आपआपसांत भिडल्याने मतदान प्रक्रि येदरम्यान केेंद्राबाहेर काहीसे तणावाचे वातावरण पसरले होते. चोख पोलीस बंदोबस्त केंद्राबाहेर असल्यामुळे तत्काळ पोलिसांनी धाव घेऊन हाणामारी करणा-यांना ताब्यात घेऊन समज दिली.