शिक्षक मतदारसंघ; आजपासून नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:14 AM2018-05-31T01:14:47+5:302018-05-31T01:14:47+5:30
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी गुरुवारपासून सुरुवात होणार असून, राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचा दणदणीत विजय झाल्यामुळे आशा बळावलेल्या शिवसेनेने शिक्षक मतदारसंघातही उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला असून, दोन दिवसांत नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने हे निवडणूक निर्णय अधिकारी असून, पाचही जिल्ह्णांचे जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. गुरुवार, दि. ३१ मे ते ७ जून या कालावधीत उमेदवारांना नामांकन दाखल करता येतील. ८ जून रोजी छाननी, ११ रोजी माघार व २५ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. २८ जून रोजी नाशिक येथे मतमोजणी होईल. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय पातळीवर याची सज्जता यापूर्वीच करून ठेवलेली आहे. निवडणूक आयोगाने १२ मे रोजीच या निवडणुकीची घोषणा करून ८ जून रोजी मतदान घेण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते; परंतु शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची विनंती प्रमुख राजकीय पक्षांनी केल्यामुळे आयोगाने निवडणूक स्थगित केली होती. नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार असे पाच जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ५२,२०६ मतदार असून, सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्णात व त्याखालोखाल नगर, जळगाव, धुळे व नंदुरबारला मतदार नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत नाशिकचे डॉ. अपूर्व हिरे शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पाडून अपक्ष म्हणून निवडून आले होते व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सहयोगी म्हणून त्यांनी सहा वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. ७ जुलै २०१८ रोजी त्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वी आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शिक्षक मतदारसंघाचे आजवर कॉँग्रेसप्रणीत शिक्षक लोकशाही आघाडीचे (टीडीएफ) वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे शिक्षक लोकशाही आघाडी कोणाला उमेदवारी जाहीर करते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी दोन महिने अगोदरच साक्रीचे संदीप बेडसे यांची उमेदवारी शिक्षक आघाडीने जाहीर केल्याने टीडीएफचा एक गट नाराज झाल्याने त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. विशेष करून नगरचे विठ्ठलराव पानसरे, भाऊसाहेब कचरे, आप्पा शिंदे या तिघांबरोबरच जळगावचे शालिग्राम भिरूड यांनीही टीडीएफकडून उमेदवारी करण्याची तयारी चालविली आहे. भाजपाने माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेकडून दराडे की चव्हाण?
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेकडून नरेंद्र दराडे हे दणदणीत मतांनी निवडून आल्यामुळे शिवसेनेचा उत्साह वाढला असून, आता विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातही उमेदवारी देण्याचा विचार पक्षपातळीवर सुरू झाला आहे. त्यासाठी नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे व शिवसेना शिक्षक आघाडीचे संजय चव्हाण यांच्या नावाची चर्चा होत आहे. परंतु चव्हाण यांचा गेल्यावेळी पराभव झालेला असल्यामुळे शिवसेना नवीन चेहरा म्हणून किशोर दराडे यांच्या नावाचा विचार करू शकते. येत्या दोन दिवसांत तशी घोषणाही होणार असल्याचे सांगण्यात आले.