शिक्षक दिनाची शिक्षकांना ‘शिक्षा’!
By श्याम बागुल | Published: September 5, 2019 06:29 PM2019-09-05T18:29:43+5:302019-09-05T18:33:28+5:30
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कालिदास कलामंदिर येथे करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेच्या शाळेच्या सर्व शिक्षकांना वेळेपुर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व शाळांची वेळही बदलण्यात आली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : शिक्षक दिनानिमित्त सर्वत्र शिक्षकांचा मानसन्मान केला जात असतांना नाशिक महापालिकेने मात्र शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजीत करून त्यासाठी शिक्षकांना दिवसभराची ‘शिक्षा’च देण्याचे फर्मान काढले आहे. शिक्षण विभागाच्या वतीने शुक्रवारी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, त्यासाठी मात्र शिक्षकांनी सकाळी शाळा करून नंतर दिवसभर कार्यक्रमास हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, महापालिकेच्या या कारभाराने शिक्षकांचा आदर सन्मान होणार की, त्यांना उपाशी-तापाशी ठेवून शिक्षक झाल्यामुळे दंडीत केले जाणार आहे असा सवाल केला जात आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कालिदास कलामंदिर येथे करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेच्या शाळेच्या सर्व शिक्षकांना वेळेपुर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी सर्व शाळांची वेळही बदलण्यात आली आहे. सकाळ असो वा दुपार अशा दोन्ही सत्रातील शाळा सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत भरविण्याच्या सुचना असून, शिक्षक सकाळी शाळेत आल्याचा पुरावा म्हणून सात वाजेपुर्वीची त्यांची ‘शाळा सेल्फी’ आॅनलाईन पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळा सुटल्यानंतर शहरातील कानाकोपऱ्यातील शिक्षकांनी थेट शिक्षक दिनाच्या कार्यक्रमास हजेरी लावणे क्रमप्राप्त असून, सदरचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालेल त्यासाठी शिक्षकांची उपस्थिती अत्यावश्यक आहे. मात्र काही शिक्षकांनी मध्येच कार्यक्रम सोडून घरचा रस्ता धरू नये म्हणून सर्व शिक्षकांना कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यक्रमस्थळावरूनच ‘सेल्फी’ पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. मुळात महापालिकेच्या शाळा शहरातील कानाकोपºयात असून, शिक्षक देखील विखुरलेले आहेत. अशा वेळी शाळा गाठण्यासाठी त्यांना सकाळी साडेसहा वाजताच घर सोडावे लागणार असून, त्यानंतर मात्र कार्यक्रम संपल्यावर घर गाठण्यासाठी सायंकाळी उशिर होणार आहे. अशा परिस्थितीत दिवसभर अन्न-पाण्यावाचून शिक्षकांना शिक्षक दिनाची शिक्षा भोगावी लागणार आहे. शिक्षकांविषयी महापालिकेला इतकाच आदर असेल तर त्यांनी शिक्षकांचा कामाचा ताण हलका करून सन्मान राखायला हवा होता परंतु शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती बंधनकारक करून त्यांना एकप्रकारे शिक्षेला पात्रच ठरविले आहे. गेल्या आठवड्यातही एका संस्थेच्या हौसेखातर महापालिकेच्या सर्व शाळांच्या शिक्षकांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी देखील सकाळपासून घराबाहेर पडलेल्या शिक्षकांना दिवसभर अन्न-पाण्यावाचून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. सदर संस्थेने या कार्यक्रमाचे श्रेय स्वत:कडे घेतले मात्र त्याची शिक्षा शिक्षकांना भोगावी लागली होती.