शिक्षक पुरस्काराचे वितरण ढकलले पुढे
By admin | Published: September 2, 2016 10:52 PM2016-09-02T22:52:26+5:302016-09-02T22:53:03+5:30
गणेश चतुर्थीचे कारण : आदर्श शिक्षकांची नावे ‘गुलदस्त्यात’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे दि. ५ सप्टेंबर रोजी होणारे पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. गणपतीनंतर हे पुरस्कार वितरण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या प्रस्तावास आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली असून, आदर्श शिक्षकांची नावे मात्र प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागाने ‘बंद पाकिटाचे’ कारण देत गुलदस्त्यात ठेवण्यात धन्यता मानल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी जिल्ह्णातून १५ तालुक्यांतून १५ आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. गुरुवारी (दि. १) शासकीय कन्या शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शिक्षण सभापती किरण थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी उर्मिला धनगर, शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्य सरोज जगताप आदि उपस्थित होते. जिल्ह्णातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण २८ प्रस्ताव आले होते. त्यातील १५ प्रस्तावांना अंतिम करण्यात येऊन ते पुरस्कार मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. त्या प्रस्तावांना विभागीय आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली आहे. या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी काही तालुक्यांतून एकेकच प्रस्ताव आल्याने त्यांनाच अंतिम करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर आली. आता पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आल्याने निवड होऊनही शिक्षकांना ‘आदर्श’ पुरस्काराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)