Teacher: एकलव्य आश्रमशाळेतील ९५ शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी, उपोषण मागे
By Sandeep.bhalerao | Published: September 7, 2023 05:07 PM2023-09-07T17:07:09+5:302023-09-07T17:07:40+5:30
Teacher: परिविक्षा कालावधी पुर्ण झाल्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू करणे अपेक्षित असतांनाही गेल्या दोन वर्षांपासून या निर्णयास स्थगिती दिल्याने शिक्षकांनी उपोषणाचा इशारा दिला होता. या शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
- संदीप भालेराव
नाशिक - परिविक्षा कालावधी पुर्ण झाल्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू करणे अपेक्षित असतांनाही गेल्या दोन वर्षांपासून या निर्णयास स्थगिती दिल्याने शिक्षकांनी उपोषणाचा इशारा दिला होता. या शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ अभ्यासक्रम असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या ३७ एकलव्य मॉडेल निवासी शाळा चालवल्या जातात. याठिकाणी इयत्ता ६ वी ते १२ वी चे वर्ग आहेत. यातून सध्या सुमारे ६००० पेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत असून उच्चशिक्षित शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. एकलव्य मॉडेल निवासी आश्रमशाळांमध्ये सरळसेवा भरतीद्वारे सन २०१८ मध्ये २२ आणि सन २०१९ मध्ये ७३ शिक्षकांची नियुक्ती तीन वर्षांचे परिविक्षा कालावधीवर करण्यात आलेली होती. या कालावधी अनुक्रमे सन २०२१ व २०२२ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू होणे अपेक्षित होते.
‘नेस्ट’ अर्थात नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडन्टस्, नवी दिल्ली यांच्याकडून या कार्यवाहीस स्थगिती दिल्याने आदिवासी विकास विभागाचा पत्रव्यवहार सुरु होता. मात्र स्थगिती कायम होती. स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी शिक्षक दिनी अर्थात ५सप्टेंबर पासून एकलव्य निवासी शाळेतील संबंधित ९५ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांचे उपोषण सुरू होते.
एकलव्य शाळेतील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागणीसंदर्भात आयुक्त नयना गुंडे यांनी याप्रकरणी ‘नेस्ट’ चे आयुक्त असित गोपाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. मात्र स्थगिती न उठल्याने पाच सप्टेंबर पासून एकलव्य निवासी शाळेतील संबंधित ९५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ५ सप्टेंबर २०२३ पासून उपोषणास बसले.
आयुक्त गुंडे यांनी उपोषणकर्त्यांच्या कृती समितीची प्रत्यक्ष भेट घेऊन उपोषण मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी आयुक्त असित गोपाल यांचेशी स्थगिती उठवणेबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली . त्यानुसार या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत तसेच स्थगिती उठवण्याबाबतचे पत्र नेस्ट, दिल्ली येथून प्राप्त झाले.