शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:38 AM2018-06-23T00:38:34+5:302018-06-23T00:38:48+5:30
नाशिक : गेल्या महिन्यापासून वाजत-गाजत असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येणार असून, त्यानंतर मात्र उमेदवार व त्यांच्या समर्थकांना फक्त मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेता येणार आहेत. दरम्यान, मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याचे पाहून प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखविण्यासाठी मेळावे, बैठका व भोजनावळीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी, प्रामुख्याने संदीप बेडसे, किशोर दराडे, भाऊसाहेब कचरे, प्रतापदादा सोनवणे, शालिग्राम भिरूड यांच्यातच चुरस लागली आहे. त्यासाठी पक्षीय व संघटनात्मक पातळीवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून प्रचार केला जात असून, त्यासाठी मेळावे, बैठका, व्यक्तिगत भेटीगाठींवर जोर देण्यात आला. विशेष करून शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पडून तीन उमेदवार रिंगणात असल्याने व प्रत्येकानेच संघटनेचा आपल्याला पांिंठबा असल्याचे जाहीर केल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी तिन्ही उमेदवारांना आपली भूमिका पटवून सांगतानाच प्रतिस्पर्ध्यांच्या उखाळ्या-पाखाळ्याही निघू लागल्याने या निवडणुकीचा प्रचार व्यक्तिगत पातळीवर होऊ लागला आहे. काही उमेदवारांनी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी भेटवस्तू तसेच भोजनावळीचे आयोजन केल्यामुळे गुरुजनही चांगभलं करून घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला जाहीर प्रचार मतदानाच्या ४८ तास अगोदर म्हणजेच शनिवारी सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येणार असून, त्यानंतर मात्र जाहीर प्रचार केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरणार आहे. निवडणूक यंत्रणेने तशी सूचना सर्वच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दिली आहे.