विजेच्या धक्क्याने शिक्षक ठार
By admin | Published: November 4, 2015 11:35 PM2015-11-04T23:35:57+5:302015-11-04T23:35:57+5:30
जायखेड्यात चार कामगार जखमी
मालेगाव : कॅम्पातील कृषिनगर भागात राहत्या घरात विजेचा धक्का लागून प्रवीण लहू खैरनार (२७) या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची खबर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई ए. एम. पाटील यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी घर साफ करत असताना प्रवीण यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचे काका अंकुश सुकदेव खैरनार, रा.चिंचवे यांनी येथील सामान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, जमादार एस. एस. बाबा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीवरून प्रवीण यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना दोन ते तीन दिवसांपूर्वीच मुलगी झाली. त्या आनंदात असलेल्या प्रवीण यांच्यावर मृत्यूने घातलेल्या घाल्याने परिसर सुन्न झाला आहे. अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेले प्रवीण हे विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर हंबरडा फोडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. प्रवीण यांच्या निधनाने शाळेला बुधवारी सुट्टी देण्यात आली होती.
जायखेड्यात चार कामगार जखमी
जायखेडा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात खांबावरील वीज तारा जोडण्याचे काम चालू असताना अचानक विद्युतपुरवठा सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून चार कामगार जखमी झाले. या घटनेला मुल्हेर सबस्टेशनचे कनिष्ठ यंत्रचालक साहेबराव गांगुर्डे यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करीत येथील संतप्त कामगारांनी वीज कार्यालयात जाऊन गांगुर्डे यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कामगार व अधिकारी गांगुर्डे यांनी परस्परांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपणास शिवीगाळ व मारहाण केल्याचे गांगुर्डे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे, तर खासगी ठेकेदार अजय थोरात यांनी साहेबराव गांगुर्डे यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. जखमींवर मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर करीत आहेत. (वार्ताहर)
अनर्थ टळला
मुल्हेर येथे खासगी ठेकेदारामार्फत खांबावर वीज तारा जोडण्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने येथे काम करणारे मजूर प्रवीण सावंत, रोशन काळे, बापू देवरे, सतीश शिंदे (सर्व, रा.आघार) यांना विजेचा धक्का लागल्याने ते जखमी झाले. या सर्वांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सुदैवाने कुणाच्याही जिवाला धोका पोहोचला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेमुळे संतप्त झालेल्या इतर मजुरांनी सबस्टेशनला जाऊन कामाचे परमीट घेतले असतानाही विद्युतपुरवठा सुरू कसा केला, यासंदर्भात आॅपरेटरला जाब विचारला.