बोलक्या बाहुल्यांद्वारे ‘शिक्षक आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:30 PM2020-09-03T19:30:56+5:302020-09-04T00:42:31+5:30
कसबे सुकेणे/ओझर टाऊनशिप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत बाणगंगानगर शाळेच्या शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांद्वारे अध्यापनाचे कार्य सुरू केलेले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. याचाच परिणाम शाळाही बंद आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनाविषयी निरसता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची शालेय अध्ययन अध्यापनातील रंजकता वाढावी, मुलांना शाळेविषयी गोडी वाटावी यासाठी नलिनी आहिरे यांनी बाहुल्यांद्वारे अध्यापन हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मुलांना आपल्यातीलच वाटणाऱ्या पात्रांना नावे देऊन मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यासारखे विषय नाट्यकरणाद्वारे शिकवायला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, मुलांची आॅनलाइन आॅफलाइन शंभर टक्के उपस्थिती निर्माण व्हावी, गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी विविध बोलीभाषेचा वापर करून व पात्रांना वेशभूषा देऊन त्यांचा वापर अध्यापनामध्ये केल्याने अध्यापन रंजक पद्धतीने होत आहे. कोणत्याही प्रकारचे बाहुल्यांचे प्रशिक्षण न घेता लॉकडाऊनच्या कालावधीचा वेळेचा सदुपयोग करून टाकाऊपासून टिकाऊ अशा विविध प्रकारच्या बाहुल्यांची निर्मिर्ती केली. मुलांना अध्यापन करताना आनंद वाटत आहे कारण बाहुल्या म्हणजे मुलांचा आवडीचा विषय असतो यातूनच त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होत आहे. या अनोख्या शैक्षणिक कार्याला निफाड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे, नूतन पवार, रामदास पवार, मुख्याध्यापक संजय पवार यांचे सहकार्य लाभत आहे.बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून कोरोनापासून संरक्षण, लेक वाचवा, बोधपर गोष्टी, वारकरी सांप्रदायातील भजन, शाहिरांचे पोवाडे, शिवाजी महाराजांचा इतिहास स्रीभ्रूणहत्या इत्यादी संदेश देऊनही जनजागृती केलेली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत अध्ययन-अध्यापनापर्यंत पोहोचण्याचे विविध माध्यम जसे ओट्यावरची शाळा, गूगल मीट, आॅनलाइन शिक्षण व्हॉट्सअॅप व्हिडिओ, यू-ट्यूब, रेनबो चॅनलच्या माध्यमातून पपेटद्वारे अध्यापनाचे आदर्श पाठांचे प्रक्षेपित होत आहे. यात इयत्तानिहाय व तासिकानिहाय पाठाचे प्रक्षेपण होत आहे. पपेटद्वारे नाट्यकरण पद्धतीने इतिहास विषयाचे पाठ घेतले जात आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे अध्यापन रंजक होत आहे.