शिक्षकांची अन्नत्याग पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 06:41 PM2020-07-31T18:41:37+5:302020-07-31T18:41:45+5:30
येवला : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत.
येवला : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत. नवयुग शिक्षक क्र ांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन खैरे व अनिस कुरेशी यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. बुधवारी औरंगाबाद येथून निघालेले हे शिक्षक सुरेगाव रस्ता (ता. येवला) येथे गुरुवारी, (दि.३०) रात्री मुक्कामी होते. राज्यातील शंभर टक्के अनुदानाला पात्र शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे शासन निर्णयानुसार अनुदान द्यावे, १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयातील घोषित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक नैसर्गिक तुकड्यांना निधीसह प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे तसेच अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे या त्यांच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य करून १५ ते १८ वर्षांपासून विनावेतन काम करत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी विनंती आंदोलनकर्ते शिक्षक गजानन खैरे आणि अनिस कुरेशी यांनी शिक्षण विभागाला केली आहे.
दरम्यान, अन्नत्याग दिंडीचा तिसरा दिवस असून, पायाला फोडं आली आणि तब्येत खालावली तरी आम्ही मागे हटणार नाही, असे सांगून शासन आश्वासने देते मात्र कृती करत नसल्याने अनेक शिक्षक वेतन नसल्याने रोजंदारी करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे शासनाने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आणि राज्यातील ५० हजार शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी हे आंदोलन सुरू केल्याचे खैरे यांनी सांगितले.