शिक्षकांमुळे विश्वाच्या अवकाशात भरारीचे बळ :ज्ञानेश्वर मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:24 AM2019-09-15T01:24:50+5:302019-09-15T01:25:06+5:30
शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पंख अन् स्वप्न दिले. त्यामुळेच जगाच्या अवकाशात भरारी मारण्याचे बळ मिळाले. घरची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ चांगले शिक्षक आणि चांगले संस्थाचालक मिळाले म्हणून मी परराष्ट्र सेवेत येऊ शकलो, असे प्रतिपादन परराष्टÑ विभागाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
नाशिक : शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पंख अन् स्वप्न दिले. त्यामुळेच जगाच्या अवकाशात भरारी मारण्याचे बळ मिळाले. घरची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ चांगले शिक्षक आणि चांगले संस्थाचालक मिळाले म्हणून मी परराष्ट्र सेवेत येऊ शकलो, असे प्रतिपादन परराष्टÑ विभागाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृहात सिनर्जी फाउंडेशनतर्फे झालेल्या ‘परराष्ट्र मंत्रालयातील अनुभवविश्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी, सिनर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप नाटकर, उपाध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, सचिव सुदीप अनावकर, सुनंदा गोसावी, सुनीता जायभावे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. एम. एस. गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त तर अॅड. जायभावे यांची महाराष्ट्र बार कौन्सिलवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. मुळे यांनी, लहानपणापासून मला प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटत असल्याने भविष्यात खूप फायदा झाल्याचे सांगितले. यूपीएससी पास झाल्यानंतर पुण्यात उपजिल्हाधिकारी झालो, पण जग बघायची उत्सुकता होती. जगातील वेगवेगळ्या भूमीवर आपले पाय लागावेत. तेथील संस्कृती, निसर्ग यांचा अनुभव घ्यावा, असे सारखे वाटत होते. जीवनाविषयीच्या या औत्सुक्यातूनच मी विदेश सेवेत आलो आणि जगाच्या सर्व खंडांमध्ये काम करण्याचा समृद्ध अनुभव घेता आला, असेही त्यांनी नमूद केले.
माझा प्रवास हा अतिशय खडतर होता. कोल्हापूरमधील माझ्या शाळेचा पहिला वर्धापनदिन होता तेव्हा त्याला शरद काळे नावाचे आयएएस अधिकारी आले होते. त्यावेळी त्यांना मिळालेला मानपान पाहून मला स्वप्न पडले की आपणही असेच अधिकारी व्हावे. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी १९ आॅगस्ट १९८३ चा दिवस उजाडावा लागला. त्या दिवशी मी गेट नंबर दोन, साउथ ब्लॉक या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश केला. तो दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. विदेश सेवेत काम करता आल्याने मला खऱ्या अर्थाने समृद्ध होता आले. या सेवेत आल्यामुळे जात, धर्म, भाषा, राज्य, प्रांत असे अभिमान आपोआप गळून पडले. खºया अर्थाने भारतीयत्वाचा अनुभव मिळत गेला. परराष्ट्र सेवेत असल्यामुळे जगाच्या सर्व सहा खंडांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे डॉ. मुळे यांनी नमूद केले.