शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 06:10 PM2018-09-26T18:10:21+5:302018-09-26T18:10:41+5:30
नांदगाव तालुका : शासनाच्या धोरणाचा निषेध
नांदगाव : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या २० पेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळा समायोजित अथवा बंद करू नये या मागणीवर शासन विचार करत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नांदगाव शाखेतर्फे संपूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण सरकार अवलंबत असल्याने याचे दूरोगामी परिणाम राज्याच्या ग्रामीण भागात होणार होतील अशी भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायदा आणून सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न दाखवायचे आणि दुसरीकडे विरोधाभासी धोरणांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, असा प्रकार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे. समितीच्या या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आंदोलनात सहभाग घेत दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. यावेळी संपर्क प्रमुख संजय बच्छाव, शिक्षक नेते राजेंद्र कदम,तालुका अध्यक्ष बोरसे, महिला आघाडी प्रमुख विजया भदाणे,राजकुमार बोरसे,धोंडीराम पठाडे,गौतम पाटील,आर. आर. बोरसे,महेश थोरे,गोसावी, मनोहर हिरे,अविनाश खोंडे, शरद सोनेज,हंसराज बोरसे आदींनी सहभाग घेतला होता.