शिक्षकांच्या कोरोना चाचणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:49+5:302021-01-21T04:14:49+5:30
नाशिक : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, ...
नाशिक : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, त्यासाठी बुधवारपासून जिल्ह्यात शिक्षक-शिक्षकेतरांच्या काेरोना तपासणीला सुरूवात झाली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पंधरा तालुक्यात केंद्र सुरू केली आहेत. शाळा सुरू करण्याच्या तयारीचा भाग म्हणून शिक्षण व आरोग्य विभागाने तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संपर्क साधून शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या व शिक्षकांच्या संख्येबाबत चर्चा केली तसेच शिक्षकांच्या कोरोना तपासणीबाबतचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित मिळून सुमारे २,०७९ शाळा असून, शिक्षकांची संख्या ७,२४३ इतकी आहे. या सर्वांची २५ जानेवारीपूर्वी कोरोना तपासणी पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी शिक्षकांसाठी कोरोना तपासणी केंद्र बुधवारपासून सुरू केले असून, एका दिवसात साधारणत: एक ते दीड हजार शिक्षकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली.
दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबतची तयारी शिक्षण विभागाने पूर्ण केली असून, सर्व गटशिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक यांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी काय खबरदारी घ्यावी व शाळा सुरू झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेंंद्र म्हैसकर यांनी दिली.