विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:35 PM2019-08-09T22:35:58+5:302019-08-10T00:19:25+5:30
महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने आमदार डॉ. सुधीर तांबे व शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.
नाशिकरोड : महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने आमदार डॉ. सुधीर तांबे व शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.
विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांची शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी भेट घेऊन विना अनुदान तत्त्वामुळेच शिक्षण क्षेत्राचे नुकसान असून, पुन्हा मूल्यांकन करणे म्हणजे भ्रष्टाचाराला आमंत्रण असल्याची टीका केली. शाळा बंद आंदोलनाला शिक्षण संस्था महामंडळाचा पाठिंबा असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.
याप्रसंगी कृती समितीचे राज्य सहसचिव गोरख कुळधर, बाळासाहेब ढोबळे, भारत भामरे, मनोज वाघचौरे, सोमनाथ जगदाळे, बाबासाहेब खरोटे, शिवाजी निरगुडे, एस. बी. शिरसाट, एस. बी. देशमुख, पुरुषोत्तम रकिबे, शरद गिते, डी.बी. पवार, अनिता गुंजाळ आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अनुदानाच्या प्रश्नावर राज्य शासनाचे धोरण नकारात्मक असून, अधिकारीही चुकीचे निर्णय घेण्यात तसेच भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याचे सांगितले. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी कृती समितीने डॉ. तांबे व संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी टाळे ठोकण्यास मज्जाव केल्याने आंदोलक शिक्षकांनी घोषणा दिल्या.