कोविड हेल्थ रुग्णालयात शिक्षकांची ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:13+5:302021-04-24T04:14:13+5:30
कोविड केअर सेंटरमधून संदर्भित केलेल्या रुग्णांना डीसीएचसीमध्ये खाटा उपलब्ध करून देणे, सरकारी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये खाटा उपलब्ध नसल्यास ...
कोविड केअर सेंटरमधून संदर्भित केलेल्या रुग्णांना डीसीएचसीमध्ये खाटा उपलब्ध करून देणे, सरकारी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये खाटा उपलब्ध नसल्यास जवळच्या शासकीय अथवा खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये संपर्क साधून तशी व्यवस्था करणे, कोविड केअर सेंटरला त्याप्रमाणे कळविणे, रुग्णांना संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला रुग्ण संदर्भित करताना खाटा आरक्षित करणे, तेथे खाटा उपलब्ध नसल्यास महापालिकेच्या कॉल सेंटरला संपर्क साधून अशा रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे आदी कामे या काॅल सेंटरच्या माध्यमातून शिक्षकांना करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या नातेवाइकांच्या समस्या संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयाने सोडवाव्या लागणार आहेत. दरम्यान, या आदेशाचा अवमान करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात देण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अलगीकरण करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून विशेषाधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना अधिकृत करून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या कॉल सेंटरमध्ये नियुक्त्या दिल्या आहेत.
चौकट-
२४ तास राहणार शिक्षक कार्यरत
सकाळी ८ ते दुपारी ४, दुपारी ४ ते रात्री १२ आणि रात्री १२ ते सकाळी ८ अशा तीन शिफ्ट शिक्षकांना या काॅल सेंटरवर ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी हे सेंटर २४ तास सुरू राहील. प्रत्येक शिफ्टमध्ये २ याप्रमाणे दररोज सहा शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकास दहा दिवस या कॉल सेंटरवर काम करावे लागणार आहे.