शिक्षक, विद्यार्थ्यांनी अडविले बंधाऱ्याद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 11:03 PM2021-11-25T23:03:55+5:302021-11-25T23:05:25+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.
जलपरिषद मित्र परिवाराने हाती घेतलेल्या वनराई बंधारा मोहिमेत भूतमोखाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कृतिशील शिक्षक अमृत चौधरी यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक प्रकाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली व जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वनराई बंधाऱ्यांची शिक्षक विद्यार्थ्यांनी निर्मिती केली आहे.
रिकाम्या गोण्यात माती टाकून आडवा बांध भरण्यात येत असून, याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही हरसूल सारख्या ग्रामीण भागात उन्हाळ्यात ग्रामस्थांना तसेच जंगली प्राणी, जनावरे, पशुपक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येत आहे.
यावेळी विहिरी तळ गाठत आहे. मात्र, वाहून जाणारे पाणी अडविल्यास जमिनीत ते मुरते व भूजल पातळीत वाढ होत असल्याने हे वनराई बंधारे काही महिन्यांसाठी ग्रामस्थांना लाभदायक ठरते, विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होत आहे. काही दिवसांनंतर हे वनराई बंधारे परिपक्व होत असल्याने काही ठिकाणी मे महिना अखेरची पाणी साठवण क्षमता तग धरून राहत आहे.
पाण्याचे महत्त्व पटू लागल्याने ग्रामस्थ हिरीरिने या मोहिमेत सहभागी होत आहेत. वनराई बंधाऱ्यांचा श्रमदानात सक्रिय होताना दिसत आहेत. यावेळी यादव महाले, प्रकाश बरफ, काशिनाथ बरफ, शिवराम बरफ, जलमित्र पोपट महाले, अनिल बोरसे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
.