शिक्षकांनी गिरविला आॅनलाइन तंत्रज्ञानाचा धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:03 PM2020-07-23T22:03:02+5:302020-07-24T00:26:45+5:30
लखमापूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील सर्व शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या दहा दिवसांपासून या आॅनलाइन कार्यशाळा संपन्न होत आहेत.
लखमापूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील सर्व शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या दहा दिवसांपासून या आॅनलाइन कार्यशाळा संपन्न होत आहेत.
गटशिक्षणाधिकारी बी.डी. कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी एस. पी. पगार यांच्या सनियंत्रणात कार्यशाळेत सुलभक म्हणून आॅनलाइन कामकाजात सातत्याने सहभाग घेणारे तंत्रस्नेही सुलभक प्रकाश चव्हाण, दत्तात्रय चौगुले, विलास जमदाडे, नौशाद अब्बास यांनी झूममिट, गुगलमिट, जिओमिट, गुगल क्लासरूम, टेलिग्रामवरील नाशिक शिक्षण हेल्पलाइन चॅनल, जिओ चॅट, एमसीईआरटीचे चॅनल तसेच व्हिडिओ कॉलिंग, कॉन्फरन्स कॉलिंग यासंदर्भात आॅनलाइन प्रत्यक्ष डेमो व पीडीएफ दाखवून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करीत आहेत.
प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा विद्या प्राधिकरण, नाशिकच्या प्राचार्या डॉ. वैशाली झनकर, अधिव्याख्याता योगेश सोनवणे, विषयतज्ज्ञ वैभव शिंदे, वाल्मीक चव्हाण, ऊर्मिला उशीर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही कार्यशाळा तालुकास्तरावर आयोजित केल्या आहेत. दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, एस. एस. घोलप, एम.एस. कोष्टी, सी. बी. गवळी, एस. पी. पगार, के. पी. सोनार, एस. डी. अहिरे यांच्यासह तालुक्यातील केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, देवराम शार्दूल, परसराम चौरे, शरद कोठावदे, रामदास धात्रक आदी उपस्थित होते.
----------------------
कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत आॅनलाइन कार्यशाळा घेऊन तंत्रज्ञानातील विविध बाबींची माहिती तालुक्यातील सर्वच शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षणातून देण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे.
- बी.डी. कनोज, गटशिक्षणाधिकारी, दिंडोरी
तंत्रज्ञानविषयक ज्ञानात भर घालणारी कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने अनुभवता आली. कॉन्फरन्स कॉलिंगपासून ते नुकतेच आलेल्या जिओ मिटपर्यंतची माहिती अतिशय सोप्या व सहज पद्धतीने प्रशिक्षक टीमकडून देण्यात आली. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होईल.
- सुनील पेलमहाले, शिक्षक, वाघाड