शिक्षक-शिक्षकेतरांची ‘वेतनकोंडी’
By admin | Published: March 3, 2017 01:44 AM2017-03-03T01:44:18+5:302017-03-03T01:44:34+5:30
पाथर्डी फाटा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये वेतन खाते असलेल्या शिक्षकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाथर्डी फाटा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये वेतन खाते असलेल्या शिक्षकांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत असून, बँकेच्या गोंधळी कारभारामुळे शिक्षकांमध्ये नारजी व्यक्त केला जात आहे. शिक्षकांच्या आर्थिक व्यवहारांसाठी बँकेचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शहर व जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेच्या व्यवहारांवरही निर्बंध घातले होते. शहर व जिल्ह्यातील जवळपास सर्वच अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचे पगाराचे खाते या बँकेच्या विविध शाखांमध्ये असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यांचे पगाराचे पैसे अडकून पडले आहेत. कधी पाचशे, हजार, दोन हजार, दहा हजार एवढेच पैसे बँकेतून काढता येत आहेत.
क्वचितच काही शाखांमध्ये दहा दिवसाला चोवीस हजार मिळतात. ही रक्कम काढण्यासाठी बँकेच्या गर्दीत तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. शाळेची वेळ अन् बँकेच्या कामकाजाची वेळ एक असल्याने रजा घेऊन अथवा शाळा बुडवून बँकेत जावे कसे अन् किती वेळा जावे अशा कात्रीत शिक्षक सापडले आहेत.
धनादेशाद्वारे व्यवहार करण्यासाठी चेकबुक मिळावे म्हणून महिना दीड-महिन्यांपासून विनंती अर्ज करूनही धनादेश पुस्तक मिळत नाहीत. आरटीजीसीने अन्य बँकांच्या खात्यात पैसे वळते करायला घ्यावेत तर या बँकेची ती पद्धत त्यातही अडचणी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
चेकबुक, आरटीजीएस या सुविधाही वेळेवर मिळत नसल्याने अडचणींमध्ये अधिक भर पडत आहे. आरटीजीएस त्याच शाखेत होत नाही. शाखेत केवळ फॉर्म भरून चेक जमा करून प्रक्रि या सुरू केली जाते.
नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयाला शाखा एखाद्या कर्मचाऱ्यांमार्फत अन्य टपालासोबत आरटीजीएसची कागदपत्रेही पाठवते. तेथून अधिकारी सोयीने अधिकारी कार्यवाही सुरू करतात.
या सर्व प्रकाराला बऱ्याचवेळा आठवडा किंवा त्याहून अधिक वेळ लागत असल्याचा अनुभव बँकेचे कर्मचारी व शिक्षकांनाही येत आहे. या सर्व कालापव्ययामुळे शिक्षकांना आर्थिक नुकसानीसह मनस्तापही सहन करावा लागतो आहे. (प्रतिनिधी)