शिक्षकाने केला पत्नीचा खून
By admin | Published: June 21, 2017 12:17 AM2017-06-21T00:17:12+5:302017-06-21T00:17:31+5:30
सिन्नर : चारित्र्याच्या संशयाने धारदार शस्त्राने वार केल्याची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : येथील शिक्षक कॉलनीतील हेरंब सोसायटीत राहणाऱ्या व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या भावाने सिन्नर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी संशयित शिक्षक पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ चिंचोली गुरव (ता. संगमनेर) येथील रहिवासी असलेले व सध्या मनेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नोकरीला असलेल्या संशयित विलास शंकर मोकळ यास पोलिसांनी पत्नी संगीता विलास मोकळ (३२) हीचा खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. विलास मोकळ हा मनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. सुमारे दहा वर्षापासून मोकळ कुटुंबीय शिक्षक कॉलनीत राहात होते. त्यांना अकरा वर्षाचा मुलगा व दहा वर्षाची मुलगी आहे. सोमवारी सायंकाळी विलास मोकळ याने बहिण संगीता हिच्या गळ्यावर व डाव्या हाताच्या मनगटाजवळ धारदार शस्त्राने वार करुन तीचा हत्या केल्याची फिर्याद भाऊ जनार्दन दत्तात्रय खंडीझोड (रा. सावळीविहिर ता. राहाता) याने सिन्नर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित विलास मोकळ याच्याविरोधात खुनााचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी विलास मोकळ यास ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक निसार सय्यद, हवालदार शहाजी शिंदे अधिक तपास करीत आहेत.