शिक्षण ऑनलाईन मग परीक्षाच ऑफलाईन का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:21+5:302021-04-05T04:13:21+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी, बारावीची परीक्षा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी, बारावीची परीक्षा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरून लागली आहे. मुंबईत काही विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी आंदोलन केल्याच्या घटनेनंतर सोशल माध्यमातून ऑनलाईन परीक्षा हा विद्यार्थांचा हक्क असल्याचे मत व्यक्त करीत शिक्षण ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन का, असा सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बारावीचे जवळपास ७८ हजार व दहावीच्या ९८ हजार विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील जवळपास ३२ लाख विद्यार्थी राज्य मंडळाकडून मे महिन्यात घेतली जाणारी दहावी बारावीची परीक्षा देणार आहेत. परंतु, सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असून, राज्य शिक्षण मंडळाची परीक्षा पुढे ढकलावी किंवा ऑनलाईन स्वरुपात घ्यावी, अशी मागणीही काही विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. तर २२ मे ते १० जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना कोरोना संकटाचा सामना करावा लागल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यात विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांचे निकाल झाल्यानंतर तिसरी पुरवणी परीक्षाही घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
इन्फो-
ऐन परीक्षेच्या तोंडावर पेच
विद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेतले आहे, तर परीक्षा ऑफलाईन का घेण्यात येतेय, असा सवाल सोशल माध्यमांतून उपस्थित करतानाच काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम अशी मोहीमही सुरू केली आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा पुनर्विचार सध्या तरी करण्यात येणार नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच स्पष्ट केले असल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर हा पेच आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत दिसून येत आहे.