संत तुकारामांच्या अभंगात तथागत बुद्धांचीच शिकवण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:44+5:302021-05-28T04:11:44+5:30
नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनातून मांडलेली समतामूलक समाजाची संकल्पना तसेच मानवता, समानता आणि कर्मकांडाला विरोध आदी ...
नाशिक : भगवान गौतम बुद्ध यांनी त्यांच्या जीवनातून मांडलेली समतामूलक समाजाची संकल्पना तसेच मानवता, समानता आणि कर्मकांडाला विरोध आदी विचारांचा वारसा पुढे सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांतून मांडून एक नवी क्रांती केली', असे विचार हभप किरणमाऊली पगार यांनी मांडले. ते परिवर्तन परिवाराच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्ताने आयोजित भगवान गौतम बुद्ध ते संत तुकाराम या विषयावरील व्याख्यान प्रसंगी बोलत होते. संत तुकारामांनी अभंगांव्दारे मांडलेले आपले विचार व बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी केलेले कार्य यात एकसमानतेचा धागा आढळून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. संत नामदेव, संत एकनाथ आदींनीही बुद्धांचे स्तुतीपर अभंग रचल्याचे दाखले त्यांनी दिले. विशेष म्हणजे या दोन्ही महापुरुषांनी आपले विचार हे तत्कालीन भाषेत म्हणजेच पाली आणि प्राकृत मराठी भाषेतच मांडून समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढले. बुद्धाने 'कर्ममार्ग' सांगितला, तर तुकारामाने 'भक्तिमार्ग' सांगितला, असेही किरण पगार यांनी नमूद केले.
ऑनलाइन झालेल्या या व्याख्यान कार्यक्रमात परिवर्तनचे सचिव प्राचार्य दिनकर पवार यांनी प्रास्ताविकाद्वारे भूमिका मांडली. परिवर्तन परिवाराचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे यांनी डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे घोषित केली. या व्याख्यानास करुणासागर पगारे, नितीन बागुल, ॲड. बनसोडे, शिक्षक नेते के.के. अहिरे, साहेबराव कुटे, निलेश ठाकूर, बाळासाहेब सोनवणे, संजय पवार, प्रकाश पानपाटील, महेश अहिरे, संजय पाटील, कवी रवींद्र मालुंजकर, नानासाहेब पटाईत आदींसह अनेकांनी उपस्थिती लावली. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन रोहित गांगुर्डे यांनी केले.