तांत्रिक समितीने फिरविली पाठ

By admin | Published: November 18, 2016 12:04 AM2016-11-18T00:04:15+5:302016-11-18T00:04:52+5:30

तलाठी दिवसभर ताटकळले : आंदोलन कायम, सर्व्हरचा त्रास होत असल्याची तक्रार

Technical Committee | तांत्रिक समितीने फिरविली पाठ

तांत्रिक समितीने फिरविली पाठ

Next

 नाशिक : तलाठी सजांची पुनर्रचना, मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा विस्तार व संगणकीय कामकाज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे पंधरा हजार तलाठी, मंडळ अधिकारी बुधवारपासून संपावर गेलेले असताना त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी येणाऱ्या शासनाच्या समितीनेही नाशिककडे पाठ फिरविल्याने जो संगणकीय अडचणींचा सामना तलाठ्यांना करावा लागतो, तसाच समितीच्या लहरी कारभाराचा अनुभव त्यांना घ्यावा लागला आहे.
सोमवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत बैठक घेऊन तलाठ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने संगणकीय कामकाज करताना म्हणजेच सातबारा उताऱ्याची नोंद, फेरफार नोंदी आदि बाबी संगणकात नोंद करताना सर्व्हरचा त्रास होत असल्याची मुख्य तक्रार तलाठी संघटनेने केली होती.
इंटरनेटची जोडणी नसणे, असलीच तर त्याला स्पीड नसणे यासारख्या गोष्टींमुळे कामकाजाची गती कमी होत असल्याने सर्व्हरचे प्रमाण वाढवून मिळावे, अशी त्यांची मुख्य मागणी होती. महसूलमंत्र्यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी व वास्तव तपासून पाहण्यासाठी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञ तसेच राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती.
या समितीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तलाठ्यांना कामकाजात येणाऱ्या अडचणी व तांत्रिक दोषाबाबत माहिती गोळा करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातूनच या संदर्भात अधिक तक्रारी येत असल्याने या समितीने आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नाशिकपासूनच करण्याचे ठरविले होते व त्यासाठी गुरुवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही समिती भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व तलाठ्यांशी चर्चा करणार होती. या चर्चेसाठी सकाळी नऊ वाजेपासूनच तलाठी व मंडळ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
तथापि, सायंकाळपर्यंत या समितीचे नाशकात आगमनच न झाल्याने अखेर वैतागलेल्या तलाठ्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, बुधवारपासून सुरू झालेले तलाठ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने त्याचा परिणाम दिसू लागला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Technical Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.