तेजोमय ताम्रवर्णी मोठ्या चांदोबाचा लुटला नाशिककरांनी आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:41 AM2018-02-01T00:41:23+5:302018-02-01T00:42:08+5:30
वेळ सव्वासहा वाजेची.. शहरात दाटलेले ढग.. खगोलप्रेमींच्या नजरा आकाशाला भिडलेल्या.. जसजशी संध्याकाळ वाढत होती तसतशी त्यांची उत्सुकता ताणली जात होती. साडेसहा वाजता अंधार पडला, पथदीप लखलखले; मात्र ‘सुपर ब्लड मून’ नजरेस पडत नसल्याने चेहरे चिंताग्रस्त होऊ लागले. अर्धा तास ढगाळ हवामान निवळले नाही; मात्र त्यानंतर आकाशात प्रथम चांदणे चमकताना दिसले अन् पुन्हा खगोलप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या.
नाशिक : वेळ सव्वासहा वाजेची.. शहरात दाटलेले ढग.. खगोलप्रेमींच्या नजरा आकाशाला भिडलेल्या.. जसजशी संध्याकाळ वाढत होती तसतशी त्यांची उत्सुकता ताणली जात होती. साडेसहा वाजता अंधार पडला, पथदीप लखलखले; मात्र ‘सुपर ब्लड मून’ नजरेस पडत नसल्याने चेहरे चिंताग्रस्त होऊ लागले. अर्धा तास ढगाळ हवामान निवळले नाही; मात्र त्यानंतर आकाशात प्रथम चांदणे चमकताना दिसले अन् पुन्हा खगोलप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या. नववर्षाचा पहिला चंद्र नाशिककरांनी सुपर मून म्हणून बघितला; मात्र बुधवारी (दि. ३१) नववर्षाच्या पहिल्या महिन्याचा अखेरचा चंद्र हा केवळ सुपर नव्हे तर ‘ब्लू ब्लड मून’चा खगोलीय आविष्कार याचि देही याचि डोळा उशिरा का होईना अनुभवता आला. संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून चंद्र पृथ्वीच्या सावलीखाली येण्यास सुरुवात झाली; मात्र ढगाळ हवामानामुळे चंद्राची सदर स्थिती दिसत नव्हती. त्यामुळे खगोलप्रेमींच्या चेहºयावर काही प्रमाणात निराशा झळकू लागली. तीस टक्क्यांनी तेजोमय व चौदा टक्क्यांनी मोठा झालेला ताम्र रंगाचा चांदोबा बघण्यासाठी बहुतांश नाशिककर खगोलप्रेमी मोकळी मैदाने, इमारतींच्या गच्चीवर तसेच गोदाकाठावर जमले होते. बहुतांश शाळांच्या भौगोलिक विभागाने त्यांच्या शालेय इमारतींच्या गच्चीवर टेलिस्कोप, दुर्बिणीची व्यवस्था करून देत विद्यार्थ्यांना हा दुर्मीळ योगाचा आनंद देण्याचा प्रयत्न केला. सव्वासात वाजेपासून ताम्रवर्णी चांदोबा हळूहळू दिसू लागला. सुमारे अर्ध्या तासानंतर मोठ्या चंद्राची खालील कडा अधिक चमकण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत संपूर्ण चंद्र हा ताम्र रंगाचा दिसत होता. आठ वाजेनंतर ख्रगास चंद्रग्रहणाचा मोठा आनंद खगोलप्रेमींना घेता आला. चंद्र अधिक तेजोमय झाल्याने प्रकाशकिरणांनी पृथ्वीचा परिसर उजळून निघाला होता.
काय आहे ‘सुपर ब्लू ब्लड मून’
जानेवारी महिन्यात दोन पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि पृथ्वी-चंद्रामध्ये कमी होणारे अंतर असे तीनही बदल एकाच दिवशी बुधवारी घडले. खगोल शास्त्रज्ञांनी या सर्व बदलांच्या आविष्काराला एकत्रितपणे ‘सुपर ब्लू ब्लड मून’असे नाव दिले.
दोन पौर्णिमा एकाच महिन्यात आल्या म्हणून या घटनेला ‘ब्लू’, खग्रास चंद्रग्रहणाला ‘ब्लड मून’ आणि पृथ्वी आणि चंद्रामध्ये कमी झालेल्या अंतराला ‘सुपर’ नावाने संबोधण्यात आले.
चंद्र पृथ्वीच्या सावलीखाली आल्यामुळे खग्रास चंद्रगहण घडले; म्हणजेच चंद्र ताम्रवर्णी दिसला. काही लोकांनी ‘ब्लू’ शब्दाचा अर्थ शब्दश: घेतला आणि त्यामुळे चंद्र निळसर होईल असा गैरसमज पसरला.